रांची – जगभरातील क्रीडापटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, भारताचे अब्जाधीश क्रिकेटपटू केव्हा पुढे येणार असा प्रश्न आता चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत. तसे शिखर धवन, सचिन तेंडुलकर यांनी मदत केली आहे, मात्र वर्षाला जवळपास 200 ते 300 कोटी रुपये कमाई असलेल्या महेंद्रसिंग धोनीने करोनापीडितांसाठी केवळ 1 लाख रुपयेच दिल्याने त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.
चीनकडून जगभरात पसरलेल्या करोनाने आतापर्यंत जवळपास 25 हजार लोकांचे प्राण घेतले आहेत, तर लाखो लोक करोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला महामारी जाहीर केले आहे. अनेक विकसित देशांनाही अद्याप या करोनावर कशी मात करायची ते उमगलेले नाही. करोनामुळे केवळ रुग्णच नव्हे तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांचे रोजगार जात आहेत. अशा लोकांच्या मदतीला सुरुवातीला धोनीने चाहत्यांना आवाहन करत मदत गोळा करायला पुढे येत आपला 1 लाख रुपयांचा वाटा दिला. मात्र, तिथेच चाहत्यांच्या टीकेला त्याला सामोरे जावे लागले आहे. भारतात देखील कोरोनाचा धोका वाढत असून आतापर्यंत काही लोकांचे बळीही गेले आहेत.
फुटबॉलपटू लिओनेस मेस्सी, टेनिसपटू रॉजर फेडरर, ख्रिस्तियानो रोनाल्डो, धावपटू हिमा दास, टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा, क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी, शिखर धवन, सचिन तेंडुलकर या व अशा अनेक खेळाडूंनी पुढे येत लाखो-करोडो रुपयांची मदत केली आहे. आफ्रिदीसारख्या अनेकांनी करोनाग्रस्तांच्या जेवणाचाही बंदोबस्त करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अशा स्थितीत धोनीने केलेल्या 1 लाख रुपयांच्या तोकड्या मदतीवर चाहत्यांनी सोशल मीडियावर ताशेरे ओढले आहेत.
धोनीने स्वतः 1 लाख रुपये जाहीर केले तर, देशातील नागरिकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर जमा झालेल्या जवळपास 12 लाख रुपयांतून गरजूंना अन्नधान्य देणार असल्याचे जाहिर केले आहे. मात्र, वर्षाला करोडो रुपयांची कमाई असलेल्या व युवकांसाठी आयडॉल असलेल्या धोनीकडून यापेक्षाही जास्त मदतीची अपेक्षा होती, अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.