मुंबई –पॅंडोरा पेपर्स या नावाने उजेडात आलेल्या कागदपत्रांत भारतातील अनेक बड्या व श्रीमंत व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सचिनसह एकूण तब्बल 300 जणांची नावे या कागदपत्रांत समोर आली आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि सचिनसह अनेक सेलिब्रिटींचाही या कागदपत्रांत समावेश आहे. अर्थात सचिनच्या वकिलांनी हे वृत्त फेटाळले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नसून त्यात सचिनचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे, असे त्याच्या वकिलांनी म्हटले आहे.
इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या पत्रकारांच्या जागतिक गटाने याबाबत एक गुप्त मोहीम राबवली होती. त्यात जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींनी कर चोरी केल्याचे नमूद करण्यात आले असून, स्वत:ची बेहिशेबी संपत्ती लपवली असल्याचे म्हटले आहे.
देशातील ज्या व्यक्तींची नावे या पॅंडोरा पेपर्समध्ये आहेत त्यात सचिनचाही समावेश आहे. सचिनने परदेशात बेनामी संपत्ती दडवून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सचिनच्या वकिलाने हा दावा फेटाळून लावला आहे.
सचिनची सर्व गुंतवणूक व आर्थिक व्यवहार नियमांनुसार व कायदेशीर आहेत व त्याची संपूर्ण माहिती आयकर विभागालाही वेळोवेळी देण्यात येते, असे त्याच्या वकिलांनी सांगितले आहे.
दरम्यान, सचिनसह त्याची पत्नी अंजली तसेच सचिनचे सासरे आनंद मेहता यांचीही नावे समोर आली आहेत.