क्रिकेटपटू पूजा बिष्णोई प्रसिद्ध झाली घराघरात

धोनीसह जाहिरातीत काम केलेली मुलगी आहे खरी क्रिकेटपटू

पुणे – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासह एका जाहिरातीत झळकलेली मुलगी पूजा बिष्णोई खरोखरची क्रिकेटपटूच आहे. केवळ जाहिरातीत ती क्रिकेट खेळत नसून प्रत्यक्ष आयुष्यातही तिला स्मृती मानधनासारखे यशस्वी क्रिकेटपटू बनायचे आहे.

या जाहिरातीत जेव्हा धोनीसह अन्य खेळाडू तिची ये लडकीयोंका खेल टेनिस है क्रिकेट नही, असे म्हणत चिडवतात तेव्हा ती देखील थाटात उत्तर देते की, खेल लडके लडकीयोंका नही, स्टॅमिना का होता है. असे उत्तर देत धोनीला गोलंदाजी करते व झेल घेत त्याला बादही करते आणि मग खुद्द धोनीही तिचे कौतुक करतो.

स्मृती मानधना, मिताली राज यांच्याकडून प्रेरणा घेत हजारो मुली या खेळाकडे वळत आहेत याची साक्षही पटते. केवळ 10 वर्षांची पूजा मूळची राजस्थानमधील जोधपूरची रहिवाशी आहे. ती प्रत्यक्ष आयुष्यातही एक क्रिकेटपटूच आहे. इतकेच नव्हे तर वयाच्या पाचव्या वर्षी सिक्‍स पॅक ऍब कमावणाऱ्या पूजाचे नाव आशियाई विक्रमांच्या पुस्तकातही नोंदले गेले आहे.

सर्वण बुधिया हे तिचे मामाच पूजाला प्रशिक्षण देत आहेत. ते देखील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत असत. मात्र, एका दुखापतीनंतर त्यांची कारकीर्द संपुष्टात आली व नंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. क्रिकेट व्यतिरक्त पूजाने सहाव्या वर्षी जोधपूर मॅरेथॉनमध्ये भाग घेत 10 किमी अंतर 48 मिनिटांत पूर्ण केले. 2019 साली 3 किमी अंतर 12.50 मिनिटांत पूर्ण करून 14 वर्षांखालील गटात विश्‍वविक्रम साकार केला आहे.

शाळा सांभाळूनही ती रोज सहा ते सात तास सराव करते. टीव्ही, मोबाइलच्या जमान्यात तसेच अन्य लहान मुलांप्रमाणे खाण्याचे हट्ट करणे पूजाच्या बाबतीत कधीही घडलेले नाही, असे खुद्द तिचे मामाच सांगतात. आता तिची कामगिरी देशांतर्गत स्पर्धेतही व्हावी व भविष्यात ती भारताच्या महिला संघाकडून खेळताना दिसावी हेच स्वप्न पूजासह तिच्या मामांनीही पाहिले आहे.

कोहली फाउंडेशनकडून मिळते मदत

पूजाला यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी जी काही आवश्‍यक आहे ती सर्व मदत 2019 सालापासून विराट कोहली फाउंडेशनकडून मिळत आहे. तिला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जोधपूरमध्ये एक सदनिका घेऊन दिली असून ती तिथेच आपल्या प्रशिक्षक असलेल्या मामांसह राहात आहे. तिच्या आई व वडिलांना खेळातील काही ज्ञान नसूनही त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असून सोशल मीडियावर तिचे सरावाचे व्हिडिओज आणि तिची कामगिरी पाहूनच विराट कोहली फाउंडेशनने तिची खेळाची तसेच शिक्षणाचीही संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.