क्रिकेटपटू राजकारणी !

योगिता जगदाळे

इम्रान अहमद खान नियाझी बनणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान! हे वाचल्यानंतर डोक्‍यात फारसा प्रकाश पडत नाही. कोण हे इम्रान अहमद खान नियाझी? जनरल नियाझीचे तर कोणी नाहीत ना? असा विचार मनात येतो. इम्रान अहमद खान नियाझी हे नावही फारसे वाचण्या-ऐकण्यातही नाही. पण इम्रान खान पाकिस्तानचा नवीन पंतप्रधान म्हटल्यानंतर मात्र एकदम वीज चमकल्यासारखा लख्ख प्रकाश पडतो. इम्रान खान! पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत त्याने स्थापन केलेल्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत आणि इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहे.

एका क्रिकेटपटूने राजकारणात मिळवलेले हे सर्वात मोठे यश आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामागे त्याची बावीस वर्षांची राजकीय धडपड आहे. जी शेवटी कोणत्याही मार्गाने का होईना, पण फळास आली. कारण त्याच्या यशामागे लष्कराची ताकद असल्याचे उघडपणे बोलले जाते. असो! त्याचे ग्रह सध्या त्याला साथ देत आहेत असे म्हणायचे. किती दिवस राहतील हा दुसरा प्रश्‍न. पण इम्रान खानच्या राजकीय कारकिर्दीकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा राजकीय क्षेत्रातील क्रिकेटपटूवर एक दृष्टिक्षेप टाकायला हरकत नाही.
तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये राजकारण चालतेच सर्वत्रच. अगदी इंग्लंडमध्येही. भारतात तर जास्तच प्रमाणात, आपल्या कोटा सिस्टिममुळे भारतीय क्रिकेटमधील राजकारण ‘पॉलिटिक्‍स इज अ डर्टी गेम म्हणतात, तसे डर्टी झालेले आहे आणि क्रिकेट व्यवस्थापनावर तर राजकारण्यांनी पूर्वीपासूनच वरचष्मा राखला आहे.
पण खरे राजकारणही क्रिकेटपटूना वर्ज्य नाही. क्रिकेटमधील राजकारण्यांचा विचार केला तर भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या भारतीय उपखंडातील क्रिकेटपटू राजकारणात अधिक लक्ष घालत असलेले दिसतात. आमदार, खासदार, मंत्री असलेले अनेक क्रिकेटपटू आहेत. आपला सर्वांचा लाडका गॉड ऑफ क्रिकेट सचिन राज्यसभेवर गेला होता. राजकारण काही त्याला फारसे रुचलेले दिसले नाही. मात्र राजकारणातही एक जंटलमन म्हणून त्याने आपली प्रतिमा राखली. खासदारकीचे आपले सारे मानधन जनकल्याणार्थ देणगी देऊन त्याने एक आगळाच पायंडा पाडला. अर्थात, इतर कोणी त्याचा कित्ता गिरवतील याची शक्‍यता नाहीच.
भारतीय क्रिकेटपटूंत कीर्ती आझाद, नवज्योतसिंग सिद्धू, महंमद अझरुद्दीन, ही राजकरणातील काही यशस्वी नावे. यापैकी दोन वेळा खासदार बनलेल्या कीर्ती आझादलाच राजकीय पार्श्‍वभूमी आहे. त्याचे वडील भागवत झा आझाद. हे बिहारचे मुख्यमंत्री होते. बाकी मात्र कोणालाही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. नवज्योत सिद्धू टीव्ही शो आणि राजकारणातील चटपट्या कॉमेंट्‌समुळे नेहमीचे चर्चेत असतो. गेली दशकभर सिद्धू राजकारणात आहे. भाजपा आणि कॉंग्रेस हे त्याचे पक्ष. आवाज ए पंजाब नावाचा पक्षही त्याने काढला होता. महंमद अझरुद्दीन हा गुणी फलंदाज मॅच फिक्‍सिंगमुळे 99 कसोटी सामन्यांवर क्रिकेटमधूनच बाद झाला. बदनाम झाला आणि क्रिकेटप्रेमींच्या मनातूनही हद्दपार झाला. कॉंग्रेसच्या तिकिटावर तो खासदार बनला होता.
बाकी टायगर पतौडी, चेतन शर्मा, विनोद कांबळी, महंमद कैफ आदींनी राजकारणात येण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अर्जुन रणतुंगा आणि सनथ जयसूर्या या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी मात्र मंत्रिपद भूषणवण्याइतके राजकारणात यश मिळवले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)