नवी दिल्ली – बांगलादेश क्रिकेट संघातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा क्रिकेटपटू मोशर्रफ हुसेन रूबेल हा ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे, त्यामुळे त्याला ढाका येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रूबेल 2019 पासून ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे.
मोशर्रफ हुसेन रूबेल यांच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, बुधवारी (14 ऑक्टोबर) त्याची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. रूबेल याची रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यापासून चाहते त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
“माझा मित्र रुबेल, मी तुझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतो. तुला मैदानात परतण्याची गरज नाही, तू फक्त तुझ्या कुटुंबाकडे परत ये.”
– मशरफे बिन मुर्तझा ( माजी कर्णधार, बांगलादेश क्रिकेट संघ)
बांगलादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज मोशर्रफ हुसेन रुबेलने 9 मार्च 2008 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 7ऑक्टोबर 2016 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. रुबेलने 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4 बळी घेतले आहेत. याशिवाय 56 देशांतर्गत टी20 सामन्यात 60 बळी घेतले आहेत.