अबाऊट टर्न: गणित

हिमांशू
उद्या कधीच उजाडत नाही. म्हणूनच उद्याचं काम आज करण्याचा सल्ला आपल्याला म्हणींच्या माध्यमातून दिला गेलाय. दुकानांमध्ये “आज रोख, उद्या उधार’ अशी पाटी लावलेली असते, ती उद्या कधी उजाडत नाही म्हणूनच! तरीही आज दिवसभर सगळेजण “उद्या’ उजाडण्याची आतुरतेनं वाट पाहणार. हे चोवीस तास अनेकांना चोवीस दिवसांसारखे वाटणार. वेळ सरता सरणार नाही. कामात लक्ष लागणार नाही. अशी उत्कंठा केवळ क्रिकेट सामन्याच्या अंतिम काही षटकांत पाहायला मिळते; परंतु सध्याची उत्कंठा अशी की, दक्षिण आफ्रिकेला “व्हाइट वॉश’ देणारा भारतीय क्रिकेट संघही दुर्लक्षित राहिला.

शतकांचे, द्विशतकांचे विक्रमावर विक्रम करणाऱ्या भारतीय फलंदाजांचीही चर्चा विशेषतः सोशल मीडियावरून फारशी झाली नाही. टीव्ही चॅनेल्सवर केवळ आकडे आणि आकडेच दिसत असले, तरी ते फलंदाजांच्या धावांचे नाहीत. वेगवेगळ्या संस्थांच्या एक्‍झिट पोलचे हे आकडे आहेत.

टीव्हीसमोर बसून आकडेमोड करणाऱ्या अनेकांची बोटं दुखू लागलीत. कारण प्रत्येक
सर्वेक्षण संस्थेचा अंदाज वेगवेगळा आहे. एका संस्थेनं तर एका पक्षाला 235 ते 242 जागा मिळू शकतील, असं म्हटलंय. किती अचूक अंदाज ना? कमाल आणि किमान जागांमध्ये एवढी तफावत येत असेल, तर त्यापेक्षा भारतीय हवामानशास्त्र खात्याचे पावसाचे अंदाज अधिक अचूक… असं म्हणण्याची वेळ! पण तरीसुद्धा या अंदाजांवर भरभरून चर्चा चाललीय, हे महत्त्वाचं!

अवघं 288 उत्तर येणारं गणित इतक्‍या वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येऊ शकतं, हा गणिताच्या अभ्यासकांनाही एक धडाच आहे. आपल्याकडे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी नाही, अशी तक्रार अनेकदा होत असते. त्यामुळंच गणिताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी खूप खालच्या क्रमांकावर राहतात, असं सांगणारे लेखही छापून आलेत. परंतु गणिताची गोडी वाढवण्यासाठी जे उपाय अशा लेखांमधून सांगितले जातात, त्यांचा अवलंब कुणीच करत नाही. खरं तर निवडणुकीच्या निकालांचं भाकित करणाऱ्या डझनभर

सर्वेक्षण संस्थांची भाकितं एकत्रित करून सरासरी काढण्याचं काम दिलं, तर गणितातला “सरासरी काढणे’ हा पाठ तरी निश्‍चितच पक्‍का होईल. आकडेमोडीची आवड लागली तर सवयही आपोआप लागते आणि ती सोपी होते म्हणे! परंतु एरवी गणित विषयापासून पळ काढणाऱ्यांचे दोन असे वर्ग आहेत, जे विशिष्ट परिस्थितीत आकडेमोडीला घाबरत नाहीत- एक वर्ग “आकडा’ लावणाऱ्यांचा आणि दुसरा निवडणूक निकालाची उत्कंठेनं वाट पाहणाऱ्यांचा! विशेष म्हणजे, हे दोन्ही वर्ग जी आकडेमोड करतात, ती इतर कुणालाही समजत नाही. उद्याच्या विधानसभा निकालाची वाट पाहणाऱ्यांपैकी काहींनी तर अनेक नवी समीकरणं, नवे सिद्धांत आणि नवी प्रमेयंही तयार केल्याचं आमच्या ऐकिवात आहे.

राजकारण हा “नंबर गेम’ असल्याचं सांगितलं जातं आणि तो सध्या जोरात चाललाय. निकालाविषयी सर्वेक्षणं करणारी मंडळी आजवर आम्हाला कधीच भेटली नसली, तरी नवी समीकरणं सांगणारे लोक हटकून भेटतात आणि डोकं खातात! अशाच एकाला यावेळी आम्हीच अवघड गणित घातलं. म्हटलं, “”एक पक्ष 10 रुपयांत थाळी देणार. दुसरा पक्ष 5 रुपयांत थाळी देणार. दोघांचं एकत्रित सरकार आलं तर थाळी किती रुपयांत आणि किती दिवसांत मिळेल?”

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.