दुबई – ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा ही आमची इच्छा आहे पण ते केवळ महसुलासाठी नव्हे तर जगातील प्रत्येक देशात क्रिकेट पोहोचवण्यासाठी आयसीसी कटीबद्ध आहे. त्यासाठीच येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाशी चर्चाही करण्यात येइल, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलॉईड यांनी व्यक्त केले आहे.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास आयसीसीला अतिरिक्त महसूल मिळण्याचा विश्वास आहे. मात्र, हे प्रयत्न केवळ महसुल मिळवण्यासाठी नाही, तर क्रिकेटचा जगभरात प्रसार व्हावा या हेतूने सुरु आहेत.
यंदा जुलै व ऑगस्टमध्ये बर्मिगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार असून यात महिलांच्या टी-20 क्रिकेटचे पर्दापण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लॉस एंजेलिस येथे 2028 साली खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा अतिरिक्त क्रीडा प्रकारम्हणून समावेश होण्याबाबत आयसीसीला आशा आहे.
महसुलाचा विचार नाही
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आल्यास आयसीसीच्या सर्व सदस्य मंडळांना त्यांच्या देशातील सरकारचे साहाय्य मिळू शकेल. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास अधिक महसूल मिळेल पण त्याचा आम्ही विचार केलेला नाही. क्रिकेट हा खेळ अजूनही काही देशांमध्ये फारसा लोकप्रिय नाही. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारासाठी ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाचा टप्पा ठरेल. काही देशांमध्ये ऑलिम्पिक खेळांना अतिरिक्त महत्त्व दिले जाते. ते क्रिकेटमध्येही यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वासही ऍरलार्डाईस यांनी व्यक्त केला.