हरयाणा, आझम स्पोर्टस अकादमी उपांत्य फेरीत

पाचवी आबेदा इनामदार महिला क्रिकेट स्पर्धा : एच. के. बाउन्स, सोलापूर पराभूत

पुणे – हरयाणा व आझम स्पोर्टस अकादमी संघानी अनुक्रमे एच. के. बाउन्स व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना संघांना पराभूत करतना “आझम स्पोर्टस अकादमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धे’च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आझम स्पोर्टस अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या पहिल्या लढतीमध्ये हरयाणा संघाने एच. के. बाउन्स संघाला 9 गडी राखून पराभूत केले. नेहा कौशिकच्या भेदक गोलंदाजी समोर एच. के. बाउन्स संघाचा डाव 13.5 षटकांत सर्वबाद 36 धावांत गडगडला. नेहा कौशिकने 7 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले. तिला सोनिया लोहियाने 2 तर रजनी दहियाने 1 गडी बाद करताना सुरेख साथ दिली.

जाई देवनारने सर्वाधिक 30 चेंडूत 15 (2 चौकार) धावांची खेळी केली. हरयाणा संघाने 3.2 षटकांत 1 बाद 37 धावा करताना विजय साकारला. परमिला कुमारीने 16 (7 चेंडू, 3 चौकार) तर तनु जोशीने 10 (8 चेंडू, 1 चौकार) धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. अनन्या कुलकर्णीने 1 गडी बाद केला. हरयाणाच्या नेहा कौशिकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या लढतीत आझम स्पोर्टस अकादमी संघाने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाला 66 धावांनी पराभूत केले. आझम स्पोर्टस अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 152 धावा केल्या. गौतमी नाईकने दमदार फलंदाजी करताना 31 चेंडूत 57 (9 चौकार, 1 षटकार) धावांची खेळी केली. तिला वैष्णवी शिंदेने 25 (13 चेंडू, 4 चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. रोहिणी माने (15) व सोनाली पाटील (14) यांनी धावसंख्या वाढविण्यास मदत केली. सोलापूर संघाकडून वैभवी जगतापने 2 तर ऋतू भोसले, प्रसिद्धी जोशी, सीमा मडगुंडी व शुभांगी शिवल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

सोलापूर संघाने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 87 धावा केल्या. सोलापूर संघाकडून ऋतू भोसले (14 चेंडू, 5 चौकार) व कल्याणी चव्हाण (21 चेंडू, 3 चौकार) यांनी प्रत्येकी 23 धावांची खेळी केली. गौतमी नाईकने 3 तर लुजैन मुजावर, किरण नवगिरे, सोनल पाटील व रोहिणी माने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गौतमी नाईकला सामानावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :

एच. के. बाउन्स : 13.5 षटकांत सर्वबाद 36 (जाई देवनार 15, नेहा कौशिक 5-7, सोनिया लोहिया 2-4, रजनी दहिया 1-7) पराभूत विरुद्ध हरयाणा : 3.2 षटकांत 1 बाद 37 (परमिला कुमारी 16, तनु जोशी 10, रमा राठोड 7, अनन्या कुलकर्णी 1-15)

आझम स्पोर्टस अकादमी : 20 षटकांत 7 बाद 152 (गौतमी नाईक 57, वैष्णवी शिंदे 25, रोहिणी माने 15, सोनाली पाटील 14, वैभवी जगताप 2-29, शुभांगी शिवल 1-20, ऋतू भोसले 1-21, प्रसिद्धी जोशी 1-30) विजयी विरुद्ध सोलापूर जिल्हा संघटना : 20 षटकांत 9 बाद 87 (ऋतू भोसले 23, कल्याणी चव्हाण 23, गौतमी नाईक 3-23, किरण नवगिरे 1-21, सोनल पाटील 1-7, रोहिणी माने 1-17, लुजैन मुजावर 1-8).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.