रांजणे क्रिकेट ऍकॅडमीा ओम क्रिकेट ऍकॅडमीवर दणदणीत विजय

पुणे – 14 वर्षाखालील गटात रांजणे क्रिकेट ऍकॅडमीच्या रचित व्होरा याने 121 धावांची खेळी करून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. रांजणे क्रिकेट ऍकॅडमी आणि ओम क्रिकेट ऍकॅडमी या संघांनी आपापल्या गटात दुहेरी विजय मिळवून येथे होत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्‍यपद’ स्पर्धेत आगेकूच केली.

स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात रचिर व्होराने 121 धावांची खेळी करत रांजणे क्रिकेट ऍकॅडमी संघाला परब क्रिकेट ऍकॅडमी विरूध्द 147 धावांनी विक्रमी विजय मिळवून देत इतिहास रचला. रांजणे क्रिकेट ऍकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडी गमावून धावफलकावर व्दिशतक लावले. रचित व्होरा 76 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावांची आपली खेळी सजवली.

रचितने आपल्या खेळीत दोन मोठ्या भागिदार्या रचल्या. दुसर्या गड्यासाठी रचित आणि रूद्रप्रकाश वाघ (13 धावा) यांनी 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्यानंतर रचितने नयन सांगवी (23 धावा) याच्यासह 82 चेंडूत 103 धावांची भागिदारी करून संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना परब क्रिकेट ऍकॅडमीचा डाव 16.4 षटकात व 53 धावांवर संपुष्टात आला.

14 वर्षाखालील गटात ओम साळुंखे याच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमीने पुना पॅंथर्स संघाचा 9 गडी राखून सहज पराभव करत आगेकूच केली. 12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात अभिनव मिश्राच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमीने मेट्रो क्रिकेट ऍकॅडमीचा 89 धावांनी सहज पराभव केला.

16 वर्षाखालील मुलांच्या गटातही रांजणे क्रिकेट ऍकॅडमीने विजय मिळवला. यश सेथिया याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रांजणे संघाने वॉरीयर्स क्रिकेट ऍकॅडमीचा 14 धावांनी निसटता विजय मिळवला. यश याने 37 धावा आणि 17 धावात 4 गडी बाद करत संघाच्या विजयात उल्लेखनीय कामगिरी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here