पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पी वाय सी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, येथील मैदानावर दि. 12 मे 2019 पासून खेळली जाणार आहे.
स्पर्धेचे नियम व पध्दत वेगळी आहे. या स्पर्धेचे सामने 2 डावांत खेळवले जाणार आहेत. पहिला डाव 40 षटकांचा व दुसरा डाव 20 षटकांचा होणार असून एक षटक 8 चेंडूचे असणार आहे, असे विनायक द्रविड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, संघातील खेळाडू बाद झाल्यास त्या संघाच्या डावातील एकुण धावसंख्येतून 5 धावा कमी करण्यात येणार आहेत. जर पहिल्या किंवा दुसऱ्या डावामध्ये संघाने आपला डाव घोषित केला तर, त्या संघातील खेळाडू सर्व बाद ठरविले जातील व संघाच्या एकुण धावसंख्येतून 50 धावा कमी करण्यात येतील.
सामन्याच्या शेवटी दोन्ही संघाच्या धावा व बाद झालेल्या खेळाडूंची संख्या समान ठरल्यास सामन्याचा निकाल हा 8 चेंडुच्या सुपर ओव्हरमधील निकालावर ठरविण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, पुर्ण 40 षटकासाठी तीस यार्डाचा नियम लागु आहे. स्पर्धेत गोलंदाजाला पहिल्या डावात जास्तीत जास्त 8 षटके व दुसऱ्या डावात 4 षटके अशी गोलंदाजी करता येईल. स्पर्धेची पध्दत व नियमांमुळे सामने शेवटच्या चेंडुपर्यंत रंगतदार ठरतील.
स्पर्धेत आयोजक पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या बरोबरच डेक्कन जिमखाना, पुना क्लब, व्हेरॉक- वेंगसरकर अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र, केडन्स असे 6 संघ या स्पर्धेत झुंजणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, तुषार नगरकर, तन्मय आगाशे, रणजित पांडे, डॉ शिरीष गांधी, कपिल खरे आदींचा समावेश आहे.