नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन जवळपास मागच्या वर्षभरापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. 2023 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. त्या टीममध्ये ईशान किशनचा समावेश होता. मात्र हा दौरा अर्धवट सोडत ईशान किशन भारतात परतला. त्यानंतर त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला. एवढेच नाहीतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्या आला. तसेच त्याला टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातदेखील स्थान देण्यात आले नाही. तर नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातूनही ईशान किशनला वगळण्यात आलं. मात्र आता त्याच्यासाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
‘या’ संघाने ईशान किशनकडे सोपवले कर्णधारपद
बुच्ची बाबू ट्रॉफीत ईशान किशन झारखंड संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे गेल्या अनेक काळापासून ईशान किशन स्थानिक क्रिकेटपासून दूर होता. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर बीसीसीआयने ईशानला स्थानिक क्रिकेट खेळण्याची तंबी दिली होती. त्यानंतर आता ईशान किशन पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ईशान किशनची स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी आहे. आता या स्पर्धेत ईशान किशनने चांगली केल्यास त्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होऊ शकतात.
बुच्ची बाबू ट्रॉफी
बुच्ची बाबू ट्रॉफीची सुरुवात 15 ऑगस्टपासून होईल. 2 सप्टेंबर सेमीफायनल तर 8 सप्टेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. चार दिवसांच्या या स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार आहे. बारा संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेतील सामने नाथम, कोईंबतूर, आणि तिरुनेवेलीमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 3 लाख रुपयांच बक्षिस दिलं जात. तर उपविजेत्या संघाला 2 लाख रोख पारितोषिक दिलं जातं.
बुच्ची बाबू ट्रॉफीमध्ये सहभागी होणार संघ
ग्रुप ए – झारखंड, मध्य प्रदेश आणि हैदराबाद
ग्रुप बी – रेलवे, गुजरात आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेवन
ग्रुप सी – मुंबई, हरियाणा आणि टीएनसीए इलेव्हन
ग्रुप डी – जम्मू-कश्मीर, छतीसगड आणि बडोदा