रोहित, बुमराह, स्मृत्ती मंधानाचाही गौरव
नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला यंदाच्या सिएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट फलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले, तर जसप्रीत बुमराह याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात 2018-19 या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. तसेच माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर, ऑस्ट्रेलियामधील कसोटी दौरा गाजवणारा आणि कसोटी मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला सर्वोकृष्ट कसोटीपटू तर सलामीवीर रोहित शर्मा याला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार स्मृती मंधानाला देण्यात आला.
यावेळी बोलताना अमरनाथ म्हणाले की, मला हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच आहे. 1983 च्या विश्वविजेत्या संघात त्यांचा समावेश होता. त्या स्पर्धेत भारताच्या विजयामध्ये अमरनाथ यांनी मोलाचा वाटा उचलला होता होता. त्यांना हा पुरस्कार माजी कर्णधार आणि अमरनाथ यांचे तत्कालीन सहकारी सुनील गावस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आगामी विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाबद्दल अमरनाथ यांनी भावना व्यक्त केल्या असुन ते म्हणाले की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात क्षमता आणि अनुभव आहे. मात्र योग्य वेळी कामगिरीत चमक दाखवण्याची गरज आहे. भारताकडे अनुभवी खेळाडू आहेत, मात्र योग्य क्षणी त्यांना लय सापडणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्याकडे क्षमता आहे, त्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता आहे. विश्वचषकाशी आयपीएलची तुलना करणे अयोग्य आहे. झटपट क्रिकेटच्या प्रकारात मोडणाऱ्या “आयपीएल’चे स्वरूप वेगळे आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेत त्यानुसार कामगिरी करणे आवश्यक आहे. जसप्रीत बुमराहकडे विविधता असून भारतासाठी तो महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो, असे अमरनाथ म्हणाले.
पुरस्कार विजेते खेळाडू –
जीवनगौरव पुरस्कार – मोहिंदर अमरनाथ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज – जसप्रीत बुमराह
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपटू – चेतेश्वर पुजारा
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा
आंतरराष्ट्रीय टी-20 सर्वोत्तम क्रिकेटपटू – ऍरॉन फिंच
उल्लेखनीय कामगिरी – कुलदीप यादव
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम टी 20 गोलंदाज – रशीद खान
देशांतर्गत सर्वोत्तम खेळाडू – आशुतोष अमन
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना
सर्वोत्तम युवा (कनिष्ठ) क्रिकेटपटू – यशस्वी जैस्वाल
क्रिकेट पत्रकारिता पुरस्कार – श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान
विशेष मानवंदना – अजित वाडेकर