पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रोहन दामलेच्या नाबाद 71 धावांच्या खेळीसह यश माने, अभिषेक परमार, साहिल छुरी यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 97 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात काल पीवायसी संघाने 40षटकात 8बाद 241धावा केल्या. डेक्कन जिमखानाचा 21 षटकांपासून आज खेळ सुरु झाला. यात स्वप्निल फुलपगारे 54, अभिषेक ताटे 38, यश बोरामनी 27, धीरज फतंगरे 19, प्रखर अगरवाल नाबाद 26, निकुंज बोरा 16यांनी धावा केल्या. पीवायसीकडून योगेश चव्हाण(33-2), रोहन दामले(28-1), साहिल छुरी(17-1), दिव्यांग हिंगणेकर(49-1), प्रदीप दाढे(39-1), यश माने(30-1) यांनी सुरेख गोलंदाजी करत डेक्कनला 227 धावांवर रोखून पहिल्या डावात 49 धावांची आघाडी घेतली. डेक्कनचे 7 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 143(वजा 35धावा)झाली.
दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 6 बाद 173धावा केल्या. पण त्यांचे 6 गडी बाद झाल्याने पीवायसीची अंतिम धावसंख्या 143(वजा 30 धावा)झाली. यात रोहन दामलेने अफलातून फलंदाजी करत 46 चेंडूत 5चौकार व 3षटकारांसह नाबाद 71 धावा चोपल्या. रोहनला दिव्यांग हिंगणेकरने 39 चेंडूत 34 धावांची संयमपूर्ण खेळी करून साथ दिली. रोहन व दिव्यांग यांनी तिसऱ्या गडयासाठी 42 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दिव्यांग बाद झाल्यानंतर रोहन दामले व मंदार भंडारी(16धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 37 चेंडूत 44 धावांची भागीदारी करून संघाला 173धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखाना संघाला विजयासाठी 193धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाला निर्धारित षटकात 8 बाद 136 धावाच करता आल्या.
डेक्कनचे 8 गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 96(वजा 40धावा)झाली. यात धीरज फतंगरे 58 चेंडूत 74धावा व यश बोरामनी 11 धावा यांनी दुसऱ्या गडयासाठी 43 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही व त्यामुळे पीवायसी संघाने डेक्कनवर 97 धावांनी विजय मिळवला. पीवायसीकडून यश मानेने 6 धावात 2गडी, अभिषेक परमारने 22 धावात 2, साहिल छुरीने 22धावात 2 गडी, तर रोहन दामले(31-1), दिव्यांग हिंगणेकर (14-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी दिव्यांग हिंगणेकर ठरला.