पुणे -साखळी फेरीत सुधांशू गुंडेती (नाबाद 100) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आर्यन्स स्पोर्टस क्लब संघाचा 65 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 50 षटकात 6 बाद 297 धावा केल्या. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर संघाच्या मधल्या फळीने संघाचा डाव सावरला. यात सुधांशू गुंडेती याने 113 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. सुधांशूला सौरभ नवलेने 73 चेंडूत 80 धावा करून सुरेख साथ दिली. सुधांशू व सौरभ यांनी चौथ्या गड्यासाठी 101 चेंडूत 100 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
आर्यन्स संघाकडून सौरभ दिघे (2-45), शुभम हारपाळे (2-64), स्वराज वाबळे (2-62) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. षटकामागे 5.94 सरासरी धावगतीचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आर्यन्स स्पोर्टस क्लबला 50 षटकांत 9 बाद 232 धावांपर्यंत मजल मारता आली. आर्यन्सकडून निनाद चौगुलेने एका बाजूने लढताना 145 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली. पण निनादची शतकी खेळी व्यर्थ ठरली. निनादला हर्ष संघवीने 32 महेश म्हस्केने 26, स्वराज वाबळेने 23 धावा करून साथ दिली. व्हेरॉक संघाकडून कार्तिक पिल्लेने 56 धावांत 4 गडी, तर विनय पाटीलने 41 धावांत 3 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी सुधांशू गुंडेती ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
साखळी फेरी – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 50 षटकात 6 बाद 297 धावा(सुधांशू गुंडेती नाबाद 100(113,10चौकार,1षटकार), सौरभ नवले 80(73,10चौकार,1षटकार), यश जगदाळे 28(24), तैस्वाल शिभम नाबाद 16(11), सौरभ दिघे 2-45, शुभम हारपाळे 2-64, स्वराज वाबळे 2-62)वि.वि.आर्यन्स स्पोर्टस क्लब: 50 षटकात 9 बाद 232धावा(निनाद चौगुले नाबाद 108(145, 12चौकार,1षटकार), हर्ष संघवी 32(35), महेश म्हस्के 26(31), स्वराज वाबळे 23(15), कार्तिक पिल्ले 4-56, विनय पाटील 3-41);सामनावीर-सुधांशू गुंडेती.