वाघोली येथील स्पर्धेस प्रतिसाद : पन्हाळा पॅंथर्स द्वितीय
वाघोली – वाघोली येथील बाजारतळ मैदानामध्ये सचिन भाडळे प्रतिष्ठान आयोजित वाघोली क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यामध्ये पन्हाळा पॅंथर्स संघाला नमवून राजगड रायडर्स संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. शिवसंस्कृतीचा वारसा म्हणून विविध किल्ल्यांची नावे असलेल्या वाघोलीतील दहा संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
राजगड रायडर्स संघाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख 11 हजार आणि सन्मानचिन्ह, पन्हाळा पॅंथर्स संघाला द्वितीय क्रमांकाचे 75 हजार आणि सन्मानचिन्ह, प्रतापगड पॉवर्स संघाला तृतीय क्रमांकाचे 31 हजार आणि सन्मानचिन्ह, लोहगड लायन्स संघाला चतुर्थ क्रमांकाचे 25 हजार आणि सन्मानचिन्ह, असे बक्षिस देण्यात आले.
पन्हाळा पॅंथर्स संघाचाचे असिफ शेख यांना मालिकावीर म्हणून दुचाकी आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदीप शेट्टी व उत्कृष्ट गोलंदाज कुंदन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष झेलचे बक्षीस अतुल विटकर, उदयोन्मुख खेळाडू म्हणून अभिषेक कुजुर आणि विकास जाधव तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रेयस बद्रिके यांना सन्मानित करण्यात आले.
वाघोली क्रिकेट लीग स्पर्धा आयोजनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धा संकल्पना व प्रमुख आयोजक अतुल बनकर, आसिफ शेख, अतुल विटकर, जावेद शेख, राहुल सातव, अजित कड, अक्षय माकर, उमेश सरोज यांनी स्पर्धेचे संयोजन केले.