पुणे – संत गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये आता देवभक्तांबरोबरच क्रिकेटभक्तांचीही मांदियाळी होईल. देवस्थानच्या वतीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान सज्ज होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत स्पर्धांतील सामने येथे होतील अशी अपेक्षा देवस्थानच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मंडळाच्या विविध वयोगटांतील सामन्यांसाठी हे मैदान सोईचे ठरणार असले तरीही अद्याप मंडळाने या मैदानाची पाहणी केलेली नाही तसेच त्याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. येत्या काळात येथे नवोदीत खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. येथील खेळपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यात येत असून चारही बाजूंना 71 यार्ड मीटरची सिमारेषा बनली आहे. परदेशातून आणलेले खास गवत लावण्यात आले असून पंजाबमधील मोहाली स्टेडियमच्या धर्तीवर सर्व सुविधा तयार करण्यात येत आहेत. मंडळाचे निरीक्षक या मैदानाची पाहणी करण्यासाठी येणार असून त्यानंतरच या मैदानाच्या उपयुक्ततेची माहिती जाहीर केली जाणार आहे, मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केले.
सरावानंतर दिव्यांग वर्ल्ड चॅम्पियन
भारताच्या दिव्यांग संघाच्या खेळाडूंनी येथे सराव केला होता. संघाने त्यानंतर झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपदही मिळविले होते. मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तयार होत आहेत. त्यात ड्रेसिंगरुम, प्रेक्षकांसाठी असनव्यवस्था तसेच अन्य सुविधांचीही निर्मिती होत आहे. मैदानात इनडोअर नेट असेल व त्यात बॉलिंग मशिनही बसविण्यात येणार आहे. सरावासाठी वेगळ्या पद्धतीचे मॅट लावण्यात येणार आहे.