नवी दिल्ली – बीसीसीआयच्या पंच पॅनलमधील पंच सुमीत बन्सल यांचे येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मात निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. त्यांचे वडील एसके बन्सल हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पंच आहेत.
2 ऑक्टोबरला तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील 19 वर्षाखालील विनू मांकड स्पर्धेच्या सामन्यात बन्सल यांना हिमाचलच्या एका फलंदाजाने मारलेला चेंडू लागला होता. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोनच दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
2006 साली एक पंच म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या सुमीत बन्सल यांनी एक प्रथम श्रेणी सामना आणि 19 लिस्ट ए सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले होते.