क्रिकेट काॅर्नर : तंत्रशुद्ध नव्हे तंत्रशून्य फलंदाजी

– अमित डोंगरे

नाचता येईना अंगण वाकडे अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याच धर्तिवर फलंदाजीचे तंत्र नाही आणि खेळपट्टी वाईट असेच म्हणावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या येथे गुरुवारी संपलेल्या कसोटी सामन्यात हेच चित्र दिसले. हा पाच दिवसांचा सामना दोन दिवसांपेक्षाही कमी कालावधीत संपला. हा कसोटी क्रिकेटचा खून आहे असेच म्हणायला हवे. 

जेव्हापासून टी-20 क्रिकेट सुरू झाले तेव्हापासून कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेला ओहोटी लागायला सुरूवात झाली. अहमदाबादमधे तर कसोटी क्रिकेटचाच बळी गेला. यात आता खेळपट्टीवर खापर फोडले जात असले तरीही ती पळवाट आहे. खरे कारण आहे ते म्हणजे सध्याच्या काळातील फलंदाजांकडे कसोटी क्रिकेटसाठी अत्यंत आवश्‍यक असलेले तंत्रच नाही. ज्या तंत्रशुद्ध फलंदाजांनी कसोटी क्रिकेटला घराघरात पोहोचवले ती गुणवत्ता आज राहिली नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. गुरूवारी केवळ दुसऱ्याच दिवशी अहमदाबादचा दिवस-रात्र कसोटी सामना संपला याला फिरकीला साथ देणारी खेळपट्टी नव्हे तर फलंदाजांची तंत्रशून्य फलंदाजीच जबाबदार आहे.

दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोनच देशात कसोटी क्रिकेट अत्यंत गांभीर्याने खेळले जाते. भारतीय संघातून राहुल द्रविड निवृत्त झाला आणी कसोटी क्रिकेटवर राज्य करणारा फलंदाज आपल्या संघाला मिळालेलाच नाही. द्रविडचा वारसदार म्हणून चेतेश्‍वर पुजाराचे कितीही गुणगान केले तरी त्यात अमिताभ बच्चन ते मिथून चक्रवर्ती इतका मोठा फरक आहे. पाच दिवसांचा खेळ होऊनही निकाल लागत नसल्याने काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटने आपली लोकप्रियता गमावली होती. मात्र, त्यात काहीसा बदल झाला व गेल्या तीन मोसमांपासून कसोटी क्रिकेट निकाली होऊ लागले व प्रेक्षकांची पाऊले पुन्हा मैदानाकडे वळू लागली. हे चित्र चांगले असले तरीही त्या दर्जाचे फलंदाजच अत्यंत कमी प्रमाणात असल्याने मर्यादित षटकांच्याच सामन्यांना महत्त्व आले आहे.

अहमदाबादच्या सामन्याबाबत बोलायचे झाले तर दोन्ही संघांचे मिळून 30 गडी बाद झाले त्यातील जवळपास 21 फलंदाज स्वतःच्या चुकीच्या शॉट सिलेक्‍शनमुळे बाद झाले. फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती हे मान्य मात्र, फ्लाईट चेंडूलाही बॅकफुटवर खेळल्यामुळेच फलंदाजांना अपयश आले. खरेतर भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर द्रविड किंवा विक्रमादित्य सुनील गावसकर फ्रन्टफुटवर खेळूनच यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पीन गोलंदाज शेन वॉर्न याने जागतिक फलंदाजांवर राज्य केले मात्र, त्याच्या गोलंदाजीची पिसे सचिन तेंडुलकरने काढली त्या मागे एक शास्त्र होते एक तंत्र होते. आज जगातील जवळपास सर्व फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूचा टप्पा पाहून कसा शॉट खेळायचा याचा विचार करतात.

सचिनकडे वेगळे तंत्र होते. तो वॉर्न किंवा मुथय्या मुरलीधरनच्या हातातून चेंडू सुटला की त्यांची ग्रीप पाहूनच सचिनला चेंडूचा अंदाज यायचा व त्याला वाटेल तसा शॉट तो खेळू शकायचा. हेच तंत्र पुढे द्रविडनेही आत्मसात केले. मात्र, आज विराट कोहलीसारखा फलंदाजही जॅक लीचसारख्या सामान्य फिरकी गोलंदाजाला स्टीअर करताना बॅकफुटवर का गेला हे समजले नाही.

या सामन्यात चेंडूच्या फिरकीमुळे नव्हे तर सरळ चेंडूंचा अदाज न आल्याने बॅकफुटवर खेळल्यामुळे बाद झाले. खरे सांगायचे तर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पाटा होती पण अनप्लेयेबल नक्कीच नव्हती. त्यांच्या जॅक क्राऊलीने व आपल्या रोहित शर्माने केलेली फलंदाजी पाहिली तर लक्षात येते की जर फलंदाजाने चेंडू फ्रन्टफुटवर खेळला तसेच संयम ठेवला व तंत्रशुद्ध फलंदाजीवरच विश्‍वास ठेवला तर धावा होऊ शकतात. मात्र, या सामन्यात तंत्रशुद्ध फलंदाजी गायब झाल्यासारखे वाटले. पाहू या चौथ्या कसोटीत काय होते ते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.