क्रिकेट कॉर्नर | जबाबदारीचे भान कधी येणार

– अमित डोंगरे

भारतीय फलंदाजी आज जगात सगळ्याच बलाढ्य मानली जाते. पण हेच वाघ प्रत्यक्ष सामन्यात मात्र कागदी ठरतात हा इतिहास इंग्लंडमध्येही कायम राहताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही याचा प्रत्यय आला. 

आक्रमकतेच्या नावाखाली अनावश्‍यक फटकेबाजी करण्याचा मोह टाळून जबाबदारीचे भान कधी येणार हा एक प्रश्‍न पुन्हा पुन्हा उभा राहात आहे.

साउदम्पटनच्या रोझ बाऊल मैदानावर ही अंतिम लढत सुरू झाली व भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी डावाची सुरुवातही केली.

मात्र, आपण कसोटी सामना खेळत आहोत की, मर्यादित षटकांचा सामना खेळत आहोत हे त्यांना निश्‍चितपणे समजले का असेच त्यांच्या अप्रोचवरून वाटत होते. त्यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली.

मात्र, चौकार मारण्याची स्पर्धा लागल्याचेच दिसत होते. हे दोघेही बचाव करताना काहीसे कमी पडत होते. मात्र, त्याचवेळी गिअर बदलून आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असल्याचे शिरसावंध मानून त्यांनी फलंदाजी केली. हा खेळ कधीतरी अंगलट येणार हे स्पष्ट दिसतही होते.

आजवर एक गोष्ट पाहण्यात आली आहे की, मोठे फलंदाज 30 किंवा 40 धावा झाल्यावर त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करतात.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण ही उदाहरणे आपण पाहिली आहेत. आक्रमक फलंदाजी वीरेंद्र सेहवागही करायचा, पण त्यानेही मोठ्या खेळी करताना चांगल्या चेंडूंना मानही दिला होता.

रोहितला हेच आज लक्षात येत नसावे. गिल तर नवखा आहे पण समोर रोहित असताना त्याने शांत राहणे महत्त्वाचे होते. दोघांनी दोन्ही बाजूंनी फटकेबाजी करण्यापेक्षा एकाने नांगर

टाकायचा व दुसऱ्याने धावा वाढवण्याची जबाबदारी स्वीकारायची हेच कसोटीचे गमक असते. द्रविडचा हात यात कोणी धरू शकणार नाही. 30-40 धावा झाल्यावर त्यांचा संयम सुटतो व ते नाहक आपल्या विकेट गमावतात.

सामन्याची स्थिती न पाहता अनावश्‍यक फटकेबाजीच्या मोहात ते अडकतात. ही लढत केवळ दोन देशांची नाही तर कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची आहे हेच त्यांनी लक्षात घेतले नाही. ज्या पद्धतीने रोहित व शुभमन बाद झाले, त्याचे समर्थन होऊच शकत नाही.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे शॉट सिलेक्‍शन हेच याचे उत्तर आहे. अर्धशतकी सलामी दिल्यावर अशी त्यांना काय घाई होती की, प्रसंगी अक्रॉस खेळून चौकार मारण्यासाठी ते सरसावत होते.

या दोघांना कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समजुतीच्या चार गोष्टी सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा चांगल्या सुरुवातीचा शेवट मात्र अपयशात परावर्तित होईल. जे या दोघांनी केले तेच काही निराळ्या पद्धतीने चेतेश्‍वर पुजाराने केले. खरेतर द्रविड निवृत्त झाल्यावर त्याचा वारसदार म्हणून पुजाराकडे पाहिले जाते.

उपखंडात नव्हे तर परदेशातील प्रत्येक मालिकेत पुजारा हाच आपल्या फलंदाजीचा कणा असतो. हा एकच फलंदाज संघात असा आहे की, त्याचे तंत्र भक्‍कम आहे. द्रविडप्रमाणे तोदेखील तासन्‌तास खेळपट्टीवर उभा राहू शकतो. त्यानेही जबाबदारी ओळखू नये याचे आश्‍चर्य वाटते.

त्याने आपल्या खेळीत तब्बल 54 चेंडू खेळले व 8 धावा केल्या. हे पाहिले की असे विचारावेसे वाटते की, अचानक अंगात संचारल्यासारखे फ्रंटफूटवर येत अक्रॉस खेळण्याची गरज काय होती.

फलंदाजीला आल्यावर पहिला किमान अर्धा तास व्हीमध्ये खेळायला काय हरकत आहे. जगातील जवळपास सगळेच क्रिकेट प्रशिक्षक हेच सांगतात की, पहिला अर्धा तास गोलंदाजाला द्या म्हणजे उर्वरित दिवसाच्या खेळात राज्य करता येईल, पण इथे समजतो कोण.

हीच बेजबाबदार वृत्ती संघाला पराभवाच्या खाईत लोटू शकते ही एक गोष्ट लक्षात घेतली तरच भारतीय संघाला या सामन्यात संधी आहे, अन्यथा पराभव ठरलेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.