fbpx

क्रिकेट कॉर्नर: अंधश्रद्धाळू!

जगात अंधश्रद्धाळू काही कमी नाहीत. जसे सर्वसामान्य व्यक्तीही काही गोष्टींबाबत अंधश्रद्धाळू असतात तसेच खेळाडूही असतात. क्रिकेटपटूही अशाच काही अंधश्रद्धा जोपासताना दिसतात. यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याची काही उदाहरणे दिसली. रॉयल चॅलेंजर बेगळुरूचा कर्णधार विराट कोहली याचाही यात समावेश आहे. फलंदाजीला जात असताना कोहली नेहमी पांढरेच शूज घालताना यंदाच्या स्पर्धेत दिसला. इतकेच नाही तर जी जर्सी परिधान केल्यावर त्याच्या धावा झाल्या तीच जर्सी तो वारंवार वापरताना या

स्पर्धेत दिसून आला आहे. खुद्द कोहलीनीदेखील हे कबूल केले आहे. फलंदाजी करताना चांगली खेळी झाली तर ग्लोव्हजही तो जपून ठेवतो व पुन्हा पुढील सामन्यात वापरताना दिसून येतो.

मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मादेखील सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या पत्नीशी संवाद साधतो. आपली पत्नी आपल्याशी बोलली की मोठी खेळी होते, अशी त्याचीही अंधश्रद्धा आहे. इतकेच नाही तर फलंदाजीला मैदानात उतरताना तो आपले उजवे पाऊल प्रथम टाकतो. तसेच फलंदाजी करत असताना त्याच्यावर दडपण आले तर मैदानातील एखादी जागा हेरतो व त्याच जागी सातत्याने पाहतो. चेंडू खेळून झाला की त्या जागी पाहिल्यावर दडपण नाहीसे होते असा त्याचा विश्‍वास आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलैचा. त्याची जन्मताऱीख 7 असल्याने तो जर्सीही त्याच क्रमांकाची परिधान करतो. 7 या क्रमांकावर त्याची विशेष श्रद्धा आहे. आता श्रद्धा की अंधश्रद्धा यात वाद होऊ शकतो.

मात्र, या क्रमांकाची जर्सी आपल्यासाठी लकी असल्याचे त्याने 2007 साली जिंकलेल्या विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेनंतरही सांगितले होते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत याच क्रमांकाची जर्सी घालूनही त्याची सरस खेळी होत नसली तरीही त्याची अंधश्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. खेळाडूंची ही अंधश्रद्धा ही काही नवी नाही. अनेक माजी खेळाडूदेखील अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवायचे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीला जाताना डाव्या पायाला पॅड बांधायचा व मग उजव्या पायाला. तसेच अत्यंत अटीतटीची लढत सुरू असेल तर ती पाहण्याऐवजी तो ड्रेसिंगरूममधील टेबलवर झोप काढायचा. 2011 च्या विश्‍वकरंडक विजेतेपदाच्या अंतिम सामन्यातही त्याने हेच केले होते. बीसीसीआयचा अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुलीही कमी नव्हता. कोणकोणत्या बाबा, बुवांचे फोटो खिशात ठेवून मैदानात उतरत असे. तसेच त्याच्या गळ्यातही अनेक माळा होत्या.

भारताचे महान गोलंदाज कपिलदेव हे देखील आपल्या जर्सीची कॉलर उभी ठेवायचे. असे केले तर जास्त बळी मिळतात ही त्यांचीही अंधश्रद्धा होती. विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही अशीच एक कृती 1983 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत केली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 5 गडी बाद झाल्यावर कपिलदेव फलंदाजीला गेले. तेव्हा एक खेळाडू वॉशरूममध्ये गेला होता. कपिलदेव यांनी सलग चौकार फटकावले तेव्हा गावसकर यांनी वॉशरूमचे दार बाहेरून बंद केले व कपिलदेव यांनी नाबाद 175 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परत येइपर्यंत तो खेळाडू तिथेच होता.

खेळातील संख्या किंवा आकड्यांचेही तसेच आहे. इंग्लंडचे प्रसिद्ध पंच डेव्हिड शेफर्डही कोणत्याही संघाची धावसंख्या 11, 222, 333 अशी (नेल्सन फिगर) झाली तर जागेवर एक उडी मारायचे. काही देशात तर 13 अंक अशुभ मानतात. एखादा खेळाडू 12 धावांवर खेळत असेल तर दोन धावा काढण्याचा किंवा चौकार व षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतो, की जेणेकरुन 13 धावांवर खेळायला लागू नये.

असो, खेळाडूच नाही तर आपण सर्वसामान्य व्यक्तीही अशाच अंधश्रद्धा जपतो. एखादा खेळाडू आक्रमक खेळत असताना आपण ज्या ठिकाणी बसलेलो असतो ते स्थान आपण तर सोडतच नाही पण आपल्या बरोबर सामना पाहात असलेल्यांनाही आपण कुठे जाऊ देत नाही. अर्थात केवळ स्थानच नाही तर सामना जिंकलेला असताना आपण ज्या काही गोष्टी अंधश्रद्धेपोटी केलेल्या आसतात त्याच आपण प्रत्येक सामना पाहाताना करतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.