क्रिकेट कॉर्नर: जिद्दी

पंजाबमध्ये जन्मलेला मनदीप सिंग एक जिद्दी खेळाडू. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याच्या कामगिरीची जशी चर्चा झाली, तशीच चर्चा त्याच्या खंबीर मनाची व लक्ष्याचा पाठलाग करताना हव्या असलेल्या संयमी खेळाचीही झाली.

यंदाच्या स्पर्धेत मनदीप किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असताना त्याची कामगिरी चमकदार झाली. दुखापत झाल्यामुळे मयंक आग्रवालला संघातून विश्रांती दिली आणि मनदीपची संघात वर्णी लागली. त्यानेही या मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याची या सामन्यात खेळतानाची मानसिकता अत्यंत कणव निर्माण करणारी होती.

या सामन्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याच्या कानावर आली आणि मैदानावर खंबीर असलेला मनदीप संपूर्ण रात्रभर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. संघात आपल्याला स्थान दिल्याचे समजल्यावर त्याने एक क्षण आकाशाकडे पाहात मैदानात पाऊल ठेवले. त्या क्षणाचे वर्णन खरेतर शब्दांत करताच येणार नाही पण त्याच्या पंजाबच्या सहकारी खेळाडूंसह सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनीही त्याला मानवंदना दिली.

हे दृश्‍य 1999 साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेची आठवण करून देणारे ठरले. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या वडिलांचे रमेश तेंडुलकर सरांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिन मायदेशी परतला, वडिलांवर अत्यसंस्कार केले व लगेचच स्पर्धेतील पुढील सामने खेळण्यासाठी इंग्लंडला परतला व केनियाविरुद्धच्या सामन्यात शतक फटकावले.

यावेळी त्याने आकाशाकडे डोळे लावून बॅट उंचावून अभिवादन केले. त्या क्षणी सचिनच्या डोळ्यांत अश्रू तराळले होते. वडिलांची माझ्यावर नजर होती, अशा शब्दांत सचिनने ओल्या डोळ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. तोच क्षण मनदीपच्या बाबतीतही दिसला. अर्थात, तो पितृशोकानंतरही अमिरातीतच थांबला होता व सामना खेळला. त्याचे वडील हरदेवसिंग गेल्या अनेक काळापासून आजारी होते. ही घटना कधीतरी घडणारच होती. पण अपेक्षित असलेली गोष्टदेखील घडल्यावर आपण स्तब्ध होतो तीच अवस्था मनदीपची झाली. या सामन्यात मनदीपच्या जास्त धावा झाल्या नाहीत. त्याला 14 चेंडूत 17 धावांची खेळी करता आली.

मात्र, यातूनच त्याच्यातील एक हळवा मुलगा व खंबीर खेळाडू संपूर्ण क्रिकेटविश्‍वाने पाहिला. तसे पाहायला गेले तर या स्पर्धेतून मनदीपला मोठ्या स्तरावर खेळण्याची तसेच आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली व त्याचा त्याने पुरेपूर लाभ घेतला. या स्पर्धेपूर्वी जेव्हा त्याने वडिलांशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी मनदीपला शतकी खेळी करण्याचा आग्रह धरला होता. तो त्यात अपयशी ठरला असला तरीही त्याची ही छोटी खेळी संघासाठी खेळता आली याचेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते.

काही वर्षांपूर्वी जेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा भागही बनलेला नव्हता तेव्हा त्यानेची याच परिस्थितीचा एकदा सामना केला आहे. एका सामन्यात संघाचा पराभव टाळण्यासाठी कोहलीनेही दिल्लीकडून खेळताना अशाच मानसिक अवस्थेचा सामना केला होता.

त्या सामन्यात कोहलीने जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा पराभव टाळला होता. तो सामन्याचा अखेरचा दिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी कोहलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून कोहली बॅट घेऊन मैदानात उतरला होता व स्वप्नवत खेळी केली होती.

अशाच काही घटनांवरून चाहत्यांनाही समजते की खेळाडू कोणत्या परिस्थितीचा सामना करतात. असो, मनदीपच्या जिद्दीचे कौतुक खुद्द सचिनने केले यातच सर्वकाही आले. जो आपल्या माता-पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडतो त्याला कधीच अपयश येत नाही असे म्हणतात. तद्वत येत्या काळात मनदीपही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करेल व वडिलांचे स्वप्नही पूर्ण करेल, असा विश्‍वास वाटतो.

– अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.