क्रिकेट कॉर्नर : अडीच मिनिटांची बोगसगिरी बंद करा

– अमित डोंगरे

आयपीएल स्पर्धेला यंदा 14 वर्षे पूर्ण होत आहेत. सुरुवातीला या स्पर्धेकडे सर्कस याच दृष्टीने पाहिले जात होते. इंडियन पैसा लीग अशी या स्पर्धेची हेटाळणीही होत होती. मात्र, आता जागतिक क्रिकेटला याच स्पर्धेतून नवनवे खेळाडू मिळू लागल्याने त्याचे महत्त्वही वाढले. 

मात्र, सामना वेळेत संपत नसल्याने दोन्ही डावांत प्रत्येकी दोन वेळा घेतले जाणारे स्ट्रॅटेजिक टाइम आऊटचे ब्रेक बंद करा, अशी मागणी आता होत आहे. कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी घेतले जात असलेले हे ब्रेकच सामना लांबण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याने ही बोगसगिरी बंद करा, असेच आता म्हणावेसे वाटत आहे.

खरेतर आयपीएल ही स्पर्धा टी-20 क्रिकेटच्या प्रकारातल होते मग त्यासाठी प्रत्येक डावात दोन स्ट्रॅटेजिक टाइम आऊटचे ब्रेक कशासाठी हाच प्रश्‍न पडतो. आंतरराष्ट्रीय सामन्यांत असे ब्रेक नसतात मग ही बोगसगिरी याच स्पर्धेत का? आणि तसेचही अडीच मिनिटात अशी कोणती स्ट्रॅटेजी ठरवली जाते व त्यातून काय लाभ होतो हा खरा मुद्दा आहे. गेल्या तीन चार मोसमांपासून हा भंपकपणा सुरू झाला आहे.

क्रिकेटचा हा प्रकार इतका वेगवान आहे की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळत नाही हे खरे पण मग अडीच मिनिटांत काय रणनीती ठरवली जाते हेदेखील एक कोडेच आहे. आयपीएल स्पर्धेचे सामने कसोटी किंवा दिवसा होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसारखे सकाळी सुरू होत नाहीत तर संध्याकाळी सुरू होतात. म्हणजेच सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघाला रणनीती ठरवण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो मग आणखी हे ब्रेक कशासाठी. हा केवळ व्यावसायिक मुद्दा आहे हे कोणीही नाकारणार नाही.

प्रत्येक सामना सुरू झाल्यावर संघाबरोबर असलेले थिंक टॅंक या वेळेत काय करतात, तसेच संघ बैठकीत खेळाडूंशी काय बोलतात त्यावर सामन्याचे बरेचसे चित्र अवलंबून असते. त्यातही ड्रिंक्‍स ब्रेकमध्येही प्रशिक्षक तसेच मेंटॉर खेळाडूंना संदेश पाठवतच असतात मग हे ब्रेक कशासाठी. मान्य आहे की या स्पर्धेला प्रचंड प्रायोजक आहेत, प्रत्येकाला सारखाच न्याय द्यावाच लागतो पण त्यासाठी खेळाचा बाज खराब करण्यात काय अर्थ आहे.

पहिला पॉवर प्ले सहा षटकांचा झाल्यावर ड्रिंक्‍स ब्रेक असतोच, तसेच एखाद्या गोलंदाजाला, फलंदाजाला किंवा क्षेत्ररक्षकाला पाणी किंवा काही हवे असल्यास तो पंचांना विनंती करू शकतो, पण त्यासाठी अडीच मिनिटांचा अतिरिक्त भंपकपणा कशासाठी.

एकीकडे बीसीसीआय तसेच आयपीए समितीने आयपीएल समितीने यंदाच्या स्पर्धेपासून नवे नियम लागू केले आहेत. तसेच वेळेत षटके पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला पाहिजे याचे गणितही ठरवून दिले आहे. त्याचबरोबर जर ही षटके वेळेत पूर्ण झाली नाहीत तर कर्णधारासह अन्य खेळाडूंवरही कठोर कारवाई करण्याची तंबीही दिली आहे.

त्यातच दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तब्बल बारा लाखांचा दंड केला गेला. मग जर वीस षटकांसाठी निर्धारित वेळ दिली गेली आहे तर मग सामना लांबवण्याला कारणीभूत ठरत असलेले हे स्ट्रॅटेजिक टाइम आऊटचे ब्रेकही बंद करा म्हणजे सामनाही वेळेत संपेल व कठोर कारवाईची गरजच पडणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.