क्रिकेट काॅर्नर : पाटा खेळपट्टीची गरज काय?

-अमित डोंगरे

भारत व इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जी खेळपट्टी तयार केली आहे त्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पडद्याआडून बॅटिंग स्पष्ट दिसून येत आहे. या खेळपट्टीवर काल परवापर्यंत हिरवळ होती, ती सामन्याच्या दिवशी सकाळी संपूर्णपणे काढून टाकण्यात आली व खेळपट्टी चक्क पाटा बनवली गेली.

हा सामना दिवसा खेळवला जात नसून दिवस-रात्र पद्धतीने प्रकाशझोतात खेळवला जात आहे. तसेच सामना गुलाबी चेंडूवर खेळला यात आहे आणि भारतीय संघात इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह हे दोन जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज असतानाही अशा स्वरुपाची खेळपट्टी बनवली जात असेल तर भारतीय वेगवान गोलंदाजीच्या भवितव्याबद्दल न बोललेलेच बरे. जसे एखादा विरहकथेचा चित्रपट पाहिल्यावर आपल्यालाही आपला प्रेमभंग झाल्यासारखे वाटते तसेच ही खेळपट्टी पाहिल्यावर बुमराह आणि कंपनीला वाटले असेल. त्यांना नैराश्‍याच्या गर्तेत जायला वेळ लागणार नाही.

हा सामना सुरू झाला, नेहमीप्रमाणे कोहलीने नाणेफेक गमावली व इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात कोहलीने जरी नाणेफेक जिंकली असती तरीही त्याने फलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला असता कारण या खेळपट्टीवर गवत शोधायला भिंग घ्यावे लागेल.
पहिल्याच दिवशी पहिल्याच डावात इशांत शर्माने टाकलेल्या पहिल्याच षटकातील पहिला चेंडू खेळपट्टीवर जीथे पडला तेथील माती उडाल्याचे स्पष्ट दिसले. आता सांगा पहिल्याच चेंडूवर जर खेळपट्टीवरील माती उडत असेल तर त्यावर गोलंदाजांचे मोटेरावर मातेरेच होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल असे सांगितले जात असले तरीही त्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या खेळपट्टीवर आता केवळ आणि केवळ फिरकी गोलंदाजांचेच राज्य राहणार हे अक्‍सर पटेलने जॉनी बेअरस्टो व जॅक क्राऊलीला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहून लक्षात आले.
भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंची निवड झाली व हा सामना प्रकाशझोतात खेळवला जात असतानाही केवळ दोनच वेगवान गोलंदाज खेळवले जाणार याचे नवल वाटले. पण पहिला चेंडू पडला आणी जेव्हा माती उडाली तेव्हाच संघात तीन फिरकी गोलंदाज कोहलीने का खेळवले याचे उत्तर मिळाले. इंग्लंडचा कर्णधार रूटनेही संघात फिरकी गोलंदाजांना नेहमीपेक्षा जास्त संधी दिली आहे. खरेतर त्याचा विश्‍वास वेगवान गोलंदाजीवर जास्त आहे मात्र, त्यानेही सकाळी खेळपट्टी पाहिल्यावर संघात फिरकी गोलंदाजांचे महत्व वाढवले.

आपल्या संघात अक्‍सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व रवीचंद्रन अश्‍विन यांचा समावेश आहे तर, त्यांच्या संघात डॉमनिक सिबली, जॅक लिच यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह कर्णधार रूटही फिरकी गोलंदाजी चांगली टाकतो. त्यामुळे हा सामना जसा फलंदाजांमध्ये रंगणार आहे तसाच तो दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांमध्येही रंगणार आहे.

मायदेशात खेळत असल्यामुळे भारतीय संघाला थोडा फायदा जास्त होणार आहे. परंतु या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाज तसेच मध्यमगती गोलंदाजांना या सामन्यात पाटा खेळपट्टीवर बळी मिळवण्यासाठी आटापीटा करावा लागणार हे मात्र निश्‍चित.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.