-अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेने काय दिले असे प्रश्न गेले 13 वर्षे विचारले जात आहेत. मात्र, यंदाच्या स्पर्धेने त्याचे खणखणीत उत्तर दिले आहे. यंदाच्या स्पर्धेत जे नवोदित खेळाडू आपली कामगिरी सिद्ध करत आहेत ते पाहता केवळ भारतीय संघालाच नाही तर जगातील क्रिकेट खेळत असलेल्या व आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांना सेकंड बेंच याच स्पर्धेतून मिळत आहेत. त्यातच एक नवा चेहरा आश्वासक वाटत आहे. प्रवीण दुबे हे या गुणवान खेळाडूचे नाव आहे.
प्रवीण लेग स्पीन गोलंदाज आहे. अनुभव कमी आहे; पण उत्तुंग झेप घेण्याचे त्याचे स्वप्नच त्याला या स्पर्धेपर्यंत घेऊन आले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याला यंदाच्या स्पर्धेत संघात घेतले आहे. प्रत्यक्ष सामना खेळण्यासाटी त्याला अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार असली तरीही त्याच्या नावाची चर्चा गेल्या वर्षापासून सातत्याने कर्नाटकमध्ये सुरू होती.
आता याच चर्चेचे रूपांतर लोकप्रियतेत झाल्याचे दिसत आहे. अनुभवी लेग स्पीन गोलंदाज अमित मिश्रा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने दिल्लीने प्रवीणला राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे. मुळातच या स्पर्धेसाठी संघ निवड करताना त्याचा समावेश करण्यात आला होता.
आता पुढील महत्त्वाच्या सामन्यांत त्याला सरप्राईज पॅकेज म्हणून खेळवले देखील जाणार आहे. दुबेची ही काही पहिलीच आयपीएल स्पर्धा नाही. यापूर्वी त्याला रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने आपल्या संघात घेतले होते. त्याला त्यावेळी तब्बल 10 लाख रुपयांचा करार देण्यात आला होता. 2016 साली त्याचा समावेश बेंगळुरू संघात झालेला असला तरीही त्याला त्या मोसमात एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नव्हते. असे असले तरीही त्याची स्थानिक क्रिकेटमदील कामगिरी पाहूनच त्याला दिल्लीने आपल्या संघात घेतले.
अजमगडमध्ये जन्मलेला दुबे केवळ 27 वर्षांचा आहे. त्याने कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये अत्यंत सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याने 8 सामन्यांत 10 बळी या स्पर्धेत घेतले होते. ही संख्या वाचून आश्चर्य वाटेल पण ही कामगिरी करताना त्याने प्रत्येक सामन्यात पूर्ण चार षटकेही गोलंदाजी केलेली नव्हती.
त्याला केवळ बदली गोलंदाज म्हणूनच खेळवले गेले होते. त्याने राज्यातील स्थानिक क्रिकेटमध्येही भरीव कामगिरी करताना 14 सामन्यांमध्ये 16 गडी बाद केले होते. या टी-20 सामन्यांत प्रवीणने गोलंदाजी करताना धावांची सरासरी चक्क सात पेक्षाही कमी ठेवली होती हेच त्याच्या गोलंदाजीचे यश म्हणावे लागेल. टी-20 मध्ये ही सरासरी सर्वात सरस समजली जाते.
उत्तर प्रदेशमध्ये जरी जन्म झालेला असला तरीही क्रिकेटच्या प्रेमाखातर त्याने कर्नाटककडून खेळण्यास प्राधान्य दिले. त्याने विद्यापीठ स्तरावरील सामन्यांत व्हिबीएस विद्यापीठ संघाकडून नेत्रदीपक कामगिरी केली व त्याला राज्य संघात निवडले गेले. त्याने मुश्ताक अली, विजय हजारे व कर्नाटक लीगमध्ये सातत्याने आपली कामगिरी सिद्ध केली व बेंगळुरू संघाची त्याच्यावर नजर गेली. तो केवळ लेग स्पीन गोलंदाज म्हणूनच यशस्वी झालेला नाही तर एक फलंदाज म्हणूनही त्याने आपला दर्जा सिद्ध केला आहे.
त्याच्या गोलंदाजीत खूप विविधता आहे. लेग स्पीन, गुगली, रॉंग वन, फ्लिपर, स्ट्रेटर वन अशी अनेक अस्त्र त्याच्या बात्यात आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सामने शिल्लक असले तरीही त्याला अंतिम संघात जर दिल्लीने स्थान दिले तर तो त्याचे सोने निश्चितच करेल असा विश्वास वाटतो.
यंदाच्या स्पर्धेने भारतीय संघासह विविध राज्यांच्या संगांना जो आश्वासक सेकंड बेंच दिला आहे त्यात ठळकपणे नाव घ्यावे अशी कामगिरी दुबेने केली आहे. आता वेळ आली आहे आयपीएलमध्ये चमकण्याची. ती संधी त्याला कधी मिळते याकडेच लक्ष लागले आहे.