क्रिकेट काॅर्नर : द्रविडकडूनही सेफ गेम

-अमित डोंगरे

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद मिळवण्यासाठी जे काही आवश्‍यक असते त्यात विजय व पराभवाची आकडेवारी पाहिली जाते. त्यामुळे भविष्यात रवी शास्त्री यांची जागा घ्यायची असेल तर राहुल द्रविडलाही यशस्वी आकडेवारी दाखवावी लागेल. हेच त्याच्या पहिल्या दोन्ही सामन्यातील सेफ गेमवरून लक्षात येत आहे. 

पहिला सामना जिंकल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी संघातील नवोदितांना अधिकाधिक संधी मिळेल असे वाटले होते. मात्र, याच सेफ गेमच्या हव्यासापोटी द्रविडनेही पहिल्या सामन्यातील विजयी संघात एकही बदल न करता तोच संघ दुसऱ्या सामन्यातही खेळवला. आता तिसऱ्या सामन्यात संघात किमान चार बदल केले जातील अशी शक्‍यता आहे. तसे पाहायला गेले तर पृथ्वी शॉ, इशान किशन, भुवनेश्‍वर कुमार, यजुवेंद्र चहल यांना बाहेर ठेवत संघातील नवोदितांना संधी दिली जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आता द्रविड काय निर्णय घेतो ते अंतिम संघ पाहिल्यावर लक्षात येईलच. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यावर भारतीय संघावर तर टीका होतच आहे पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत द्रविडला या पदावर नियुक्‍त केले जावे अशी मागणीही होत आहे. खुद्द द्रविडने याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नसले तरीही त्यालाही या पदावर येण्याची इच्छा असणार हे निश्‍चित पण त्यापूर्वी आपला सीव्ही बळकट व्हावा म्हणून श्रीलंकेविरुद्धची मालिका निर्विवाद जिंकली तरच त्याचा दावा भक्‍कम होईल हे तोदेखील जाणून असेल.

दुसरीकडे शास्त्री यांना बीसीसीआयमधील काही व्यक्‍तींचा विरोध होता पण कर्णधार विराट कोहलीच्या समर्थनामुळे त्यांची नियुक्‍ती केली गेली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी शास्त्री यांचे संबंध फारसे चांगले नाहीत आणि द्रविडबाबत मात्र गांगुली अत्यंत अनुकूल असणार हे वेगळे सांगायला नको.

या दोन खेळाडूंची मैत्री जगजाहीर आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा गांगुली संघाचा कर्णधार होता व एकदिवसीय संघातील द्रविडची जागा धोक्‍यात आली होती तेव्हा गांगुलीनेच द्रविडला फलंदाजीसह यष्टीरक्षकाची भूमिका दिली व त्याची कारकीर्द वाढवली हे देखील सर्वश्रुत आहे. त्यामुळे शास्त्री आणि द्रविड यांच्यातील एकाची निवड करायची झाली तर गांगुलीचे मत द्रविडच्याच पारड्यात पडेल यात शंका नाही.

असो, द्रविडचे लक्ष नवोदितांना जास्तीत जास्त संधी द्यावी की सेफ गेम करत आपला बायोडाटा मजबूत करण्याचे आहे हे तर आता उघडउघड दिसत आहे. भारताच्या आजवरच्या प्रशिक्षकांपेक्षा वेगळा भासणारा द्रविडही सेफ गेमसाठी अनुकूल असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटले इतकेच.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.