-अमित डोंगरे
क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी, असे म्हटले जाते. हेच सूत्र यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही खरे ठरत आहे. या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून विविध संघांकडून खेळत असलेले स्टार खेळाडू आपली कामगिरी सिद्ध करत आपल्या नावाचा गाजावाजा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली, रोहित शर्मा असे स्टार खेळाडू संमिश्र यश मिळवत असताना एक खेळाडू मात्र, क्रिकेट जाणकारांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. राहुल तेवतिया असे या खेळाडूचे नाव.
जागतिक क्रिकेटच्या मंचावर जाऊन तेथे कामगिरी सिद्ध करण्यासाठी तेवतिया सज्ज आहे. त्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच जाणकारांना आपली दखल घ्यायला लावली. तो किती तंत्रशुद्ध आहे किंवा त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्याची गुणवत्ता आहे का, हे व असे अनेक प्रश्न जरी सध्या विचारले जात असले तरीही त्याने यंदाच्या स्पर्धेत जे सातत्य दाखवले आहे ते पाहता त्याच्याकडे इंडिया मटेरियल म्हणून पाहिले जात आहे हे कोणीच नाकारणार नाही.
मूळचा हरियाणाचा असलेला तेवतिया जेव्हा यंदाच्या स्पर्धेत प्रत्यक्ष मैदानात कामगिरी सिद्ध करताना दिसला तेव्हा त्याच्याकडे अनेकांनी आश्चर्याचा कटाक्ष टाकला होता. राजस्थानकडून यंदाच्या स्पर्धेत खेळत असलेला तेवतिया याच्याकडे अफाट गुणवत्ता असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संघात कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबीन उथप्पा व रियान परागसारखे भक्कम फलंदाज असतानाही हा अष्टपैलू खेळाडू मैदानात आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण तेवातियाला वरच्या क्रमांकार फलंदाजीला उतरवणे अनेकांच्या पचनीच पडले नव्हते.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन बाद झाला त्या 17 व्या षटकात तेवातियाने 23 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याच्यावर टीकाही सुरू झाली होती. मात्र, अचानक त्याने आक्रमक धोरण स्वीकारले व दमदार अर्धशतक फटकावताना त्याने जी तडाखेबंद फलंदाजी केली त्यामुळे एकवेळ पराभव होण्याची चिन्हे दिसत असतानाच तेवतियाच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने पंजाबवर मात केली. त्याच्या याच खेळीचे या दिग्गजांनी कौतुक केले आहे. त्यामुळे तेवतियाचे नाव संपूर्ण देशभरात गाजले.
तेवातियाने 2014 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. त्यानंतर तो 2017 सालापासून किंग्ज इलेव्हन पंजाबकडे गेला. पुढील दोन वर्षे तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. यंदाच्या स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला राजस्थानने आपल्याकडे घेतले. त्याची यंदाच्या
स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याला मुक्त केल्याचा पश्चात्ताप दिल्ली संघाला होत असेल.
तेवतियासारखे खेळाडू आयपीएल स्पर्धेतच खेळतात त्यांना मोठ्या व्यासपीठावर यश मिळत नाही, अशी ओरडही सध्या सुरू झाली असली तरीही तो डगमगलेला नाही. त्याची फलंदाजी तर भक्कम आहेच शिवाय तो गोलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने येत्या काळात भारतीय संघात फिट बसेल.
एकेकाळी अशीच ओरड रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांच्याबाबतही झाली होती. याच दोन खेळाडूंनी भारतीय संघात स्थानही मिळवले व ते आजतागायत राखलेही आहे. त्यामुळे येत्या काळात तेवतिया कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून समोरच्या संघातील गोलंदाजीचा पालापाचोळा करताना दिसल्यास नवल वाटणार नाही.