क्रिकेट कॉर्नर : कामगिरी पृथ्वी मोलाची

अमित डोंगरे

पृथ्वी शॉ याला सचिन तेंडुलकरचा वारसदार म्हणून अनेकदा संबोधले गेले. पण त्याला वारसदार म्हणावे का शापित गंधर्व हाच खरा प्रश्‍न आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी केल्यानंतर संघातील स्थान गमावल्यानंतर त्याला शहाणपण सुचले व त्याने देशांतर्गत विजय हजारे करंडक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली व नुकत्याच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेतही तो मोलाची कामगिरी करत आहे.

त्याची फलंदाजी पाहणे खरेच एक ट्रीट आहे. पण तो वारंवार ज्या पद्धतीने बाद होतो ते पाहणे त्रासदायक असते. जगातील कोणताही फलंदाज असो, त्याला जर त्याचा ऑफस्टम्प कुठे आहे ते जर माहीत नसेल तर ते व्यर्थ समजले जाते. खूप वर्षांपूर्वी हाच प्रश्‍न खुद्द सचिनलाही सतावत होता. आपणही हे अनेकदा पाहिले आहे की, सचिन वारंवार त्रिफळाबाद होत होता किंवा आत येणाऱ्या चेंडूवर पायचित होत होता.

त्यानंतर सचिनने विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्याकडून टिप्स घेत आपले तंत्र आणखी मजबूत केले. अर्थात तरीही सचिन जितका सहजतेने त्रिफळा किंवा पायचित बाद होत होता, तितक्‍या सहजतेने राहुल द्रविड कधीही बाद होत नव्हता. याचे कारण म्हणजे जर तंत्रशुद्धतेचा निकष लावला तर द्रविड सचिनपेक्षाही जास्त उजवा होता.

आज जागतिक क्रिकेटमध्ये पृथ्वी नवखा आहे. तरीही त्याच्या भोवती एक वलय निर्माण झाले आहे. एखादा फलंदाज असा असतो, की ज्याला कोणी अन्य गोलंदाजाने बाद करण्यापेक्षा तो स्वतःच्याच चुकांनी बाद होतो. पृथ्वीही तसाच फलंदाज आहे. त्याच्याकडे सर्वदूर फटके आहेत. तो सर्व मैदान कव्हर करू शकतो, पण तंत्रातील दोष त्याला भोवतात हेदेखील तितकेच खरे आहे.

ऑस्ट्रेलियावरून परतल्यावर त्याने माजी कसोटीपटू व प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याकडे पुन्हा एकदा धडे गिरवले व त्यामुळे त्याच्याकडून हजारे करंडक स्पर्धेत सरस कामगिरी घडली. तेच सातत्य त्याने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही दाखवले.

मात्र, स्टेपआऊट होत अनेकदा अपयशी ठरण्याचा त्याचा स्वभाव कधी सुटणार हे आता जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. या पहिल्याच सामन्यात त्याने 38 चेंडूत 72 धावांची खेळी करताना 9 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. त्याने केलेली फटकेबाजी महत्त्वाची नसून त्याने या डावात इनस्विंगर, आऊट स्विंगर, स्लोअरवन, नक्कल बॉल, यॉर्कर, लेग कटर या सगळ्या चेंडूंवर भक्कम तंत्र दाखवले याचे महत्त्व आहे. त्याने या सामन्यात इनसाईड आऊट पद्धतीने फलंदाजी करत गोलंदाजांना त्रिफळा उडवण्याचा तसेच पायचित पकडण्याची संधीच दिली नाही. हेच मोठ्या फलंदाजाचे वैशिष्टय असते.

तसे पाहिले तर सचिनचे वारसदार म्हणून अनेक फलंदाजांची नावे घेतली गेली व अजूनही घेतली जातात, पण त्याच्या जवळही कोणी पोहोचू शकलेला नाही हे अंतिम सत्य आहे. त्या मनाने विराट कोहलीने सचिनच्या विक्रमांचा पाठलाग सुरू केला असला तरीही तो सचिन बनू शकत नाही. त्यामुळे आता पृथ्वीला सचिनचा वारसदार म्हणण्यापेक्षा सचिनसारखा फलंदाज म्हणणेच योग्य ठरेल. त्याने सचिनची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची प्रश्‍नपत्रिका स्वतः सोडवली तरच तो स्वतःची ओळख निर्माण करेल.

अन्यथा सचिनशी तुलना होत राहिली तर जे इंझमाम उल हक, ग्रॅहम हिक यांची झाली तीच परिस्थिती पृथ्वीचीही होईल. अर्थात, ऑस्ट्रेलियात आलेल्या अपयशाने त्याला उशिरा का होईना, पण शहाणपण सुचल्याचे दिसत आहे व सध्या तरी आयपीएलचा संघ काय किंवा भारतीय संघ काय त्यांना अशाच पृथ्वी मोलाच्या कामगिरीची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.