-अमित डोंगरे
जागतिक क्रिकेटमध्ये आजच्या घडीला जे वादळी फलंदाजीसाठी ओळखले जातात त्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेल्या मॅक्सवेलचे अपयशच त्याच्या संघाची चिंता वाढवत आहे.
करोडो रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलेल्या मॅक्सवेलने सगळ्यांनाच निराश केले आहे. या स्पर्धेपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता व त्यात सर्वात मोलाचा वाटा मॅक्सवेलनेच उचलला होता. मात्र, त्या मालिकेनंतर थेट अमिरातीत आयपीएल स्पर्धेसाठी आलेला मॅक्सवेल धावांचा जोगवा मागताना दिसत आहे.
एखादा क्लब दर्जाचा फलंदाज एकेरी दुहेरी धावा घेताना दिसला तर कोणालाही त्यात गैर वाटत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचे, चौकारांचे, षटकारांचे व आक्रमकतेचे इमले रचणारा मॅक्सवेल या स्पर्धेत मात्र, साफ अपयशी ठरत आहे. त्याच्या बॅटमधून धावा तर निघताना दिसत नसून त्याची उपयुक्त फिरकी गोलंदाजीही अपयशी ठरली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे तत्त्व असते, परफॉर्म ऑर पेरिश. तसे तत्त्व जर मॅक्सवेलच्या बाबतीत पंजाबने लावले तर यापुढील प्रत्येक सामन्यात पंजाबला त्याच्या जागी तोडीसतोड खेळाडू घ्यावा लागेल आणि त्यांचा सेकंड बेंच पाहता मॅक्सवेलला पर्याय ठरेल असा खेळाडू यंदा तरी त्यांच्याकडे नाही. मॅक्सवेलसारखे फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही दर्जाच्या गोलंदाजीवर तसेच कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही देशात यशस्वी होतात कारण त्यांचा दर्जा देशावर किंवा या सर्व घटकांवर अवलंबून नसतो.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्याप्रमाणे खेळपट्टीवर आल्यापासून त्यांचेच राज्य असते व समोरचे गोलंदाज धडाधड मांडलीकत्व पत्करताना दिसतात. यंदा मात्र, मॅक्सवेल आयुष्यात पहिल्यांदाच क्रिकेट खेळत असल्यासारखा वावरताना दिसत असून त्याचाच सर्वाधिक त्रास त्याच्या संघाला व चाहत्यांना होत आहे.
पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुल व मयंक आग्रवाल हेच दोन फलंदाज त्यांच्याकडून यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच हे दोघे खेळले किंवा बाद झाले की, त्यांचा पराभव ठरलेला असतो हेच या स्पर्धेत सातत्याने सिद्ध झाले आहे. तसेही पंजाब संघाला या स्पर्धेच्या इतिहासात आरंभशूर म्हणून हिणवले गेले आहे. ही त्यांची चोकर्स वृत्तीच त्यांचा घात करत आहे.
यंदाच्या स्पर्धेत सलग 6 सामन्यांत मॅक्सवेल फ्लॉप गेला असून आता त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का, असे प्रश्न पंजाब संघाचे चाहते विचारत आहेत. युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल, दीपक हुडा अशा सरस खेळाडूंना बाहेर ठेवून पंजाबचा संघ सातत्याने मॅक्सवेललाच का खेळवत आहे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
मॅक्सवेलच्या अपयशासह त्यांच्या संघाला सातत्याने पराभव स्वीकारावे लागल्याने गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर त्यांचा संघ फेकला गेला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांत सहा पराभव पंजाबला पत्करावे लागले आहेत. त्यांनी बेंगळुरू विरुद्धच्या एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. या सातही सामन्यात मॅक्सवेलची कामगिरी सुमार झालेली आहे.
मॅक्सवेलने 1, 5, 13, 11, 11, 7 व 10 अशा मिळून एकूण फक्त 58 धावा केल्या आहेत. लिलावात करोडो रुपयांची बोली लावून घेतलेल्या मॅक्सवेलच्या या अपयशी कामगिरीवर पंजाबलाच उपाय शोधला पाहिजे. नाव मोठे लक्षण खोटे हेच मॅक्सवेलच्या बाबतीत खरे ठरत आहे.