भारत व न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु झाला. नाणेफेकीपूर्वीच जेव्हा दोन्ही संघांनी आपापले अंतिम संघ जाहीर केले तेव्हाच मिठाचा खडा पडला. भारतीय संघातून महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वगळले गेल्याचे समजल्यावर धसकाच बसला. वास्तविक वानखेडेच्या खेळपट्टीवर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासूनच रिव्हर्स स्विंग मिळतो, अशी स्थितीत बुमराह संघात नसणे भारतीय संघासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे.
वेगवन गोलंदाज आकाश दीपला संघात घेणे ते समजू शकतो, परंतू त्याच्यासाठी बुमराहचा बळी का घेतला गेला हे कोडेच आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्मा यांच्या डोक्यातून ही अचाट कल्पना कशी काय आली हा देखील प्रश्न आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर पहिले दोन दिवस स्विंग मिळतो व बुमराह त्यात माहिर आहे. तसेच नंतरचे तिन दिवस खेळपट्टी जरी फिरकीला साथ देणारी ठरते. तरीही वेगवान गोलंदाजंना विशेषतः बुमराहला रिव्हर्स स्विंग मिळणार हे उघड आहे.
त्यातच न्युझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी घेतली व आता ते मोठी धावसंख्या उभारून भारतावरच दडपण टाकतील जे त्यांनी पहिल्या दोन्ही कसोटीत केले. वॉशिंग्टन सुंदर चांगला गोलंदाजी करत आहे. अशा स्थितीत आकाशदीपला वगळून बुमराहचे स्थान कायम ठेवले गेले आवश्यक होते व संघात प्रयोग म्हणून रविचंद्रन अश्विनच्या जागी अक्सर पटेलला संधी द्यायला हवी होती. अश्विन मोठा गोलंदाज आहे, परंतू या मालिकेत त्याने फारसा प्रभाव पाडलेला नाही. तसेच तो फलंदाजीतही चमकलेला नाही. पटेलही दोन्ही कामे लिलया करु शकतो.
धावांसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला वगळल्याचे दुखः नाही परंतू ध्रुव जुरेलला ही संधीच मिळाली नाही, याचेही कारण समजले नाही. तो तर नवोदित आहे. त्याला जास्तीत जास्त संधी मिळाली पाहीजे. केवळ ऋषभ पंत फिट आहे हे काही जुरेलला संधी न देण्याचे कारण असू शकत नाही. जुरेल एक चांगला फलंदाजही आहे.
वानखेडेची खेळपट्टी लाल मातीची असते. त्यावर बुमराहसारखाच गोलंदाज यॉर्कर, रिव्हर्स स्विंग, इन स्विंग व आउट स्विंग असे कितीतरी चांगले चेंडू टाकून समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवू शकतो. असे असून गंभीर व रोहितच्या मनात काय होते संघ निवडी दरम्यान ते त्या परमेश्वरालाच माहिती… मात्र, एक निश्चित या कसोटीत बुमराह नसण्याचा तोटा भारतीय संघाला बसल्याशिवाय राहणार नाही.
जो तुमच्या संघातील सर्वात प्रतिभावान गोलंदाज असतो त्याला मालिकेतील सगळेच सामने खेळायला मिळाले पाहीजेत. भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज बुमराहच आहे, मग त्यालाच वगळण्याचा कारणच काय.? भारताला हा सामना जिंकण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करावे लागणार आहे. कारण हा सामना गमावला, तर आपण संपूर्ण मालिकाच गमावणार आहोत व आपले जागतिक कसोटी अजिंक्यपद सपर्धेतीलल अंतिम फेरीतील स्थानही धोक्यात येणार आहे. हे सगळे माहिती असताना ही जी संघ निवड केली आहे ती भारतीय संघाला चांगलीच महागात पडणार आहे.