-अमित डोंगरे
भारतीय संघाचा मिस्टर डिपेंडेबल, द वॉल राहुल द्रविडकडे बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद देऊन कोणतीही चूक केलेली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांचेच काही सामने पार पडलेले असून त्यात द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले त्याचे पाच शिष्य यंदाची स्पर्धा गाजवताना दिसत आहेत. त्यांची कामगिरी हीच द्रविडसाठी गुरुदक्षिणा ठरत आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून स्टार खेळाडूंना आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली तरी द्रविडचे हे शिष्य मात्र धडाकेबाज कामगिरी करत आहेत.
संजू सॅमसन, इशान किशान, पृथ्वी शॉ, शुभमन गिल व देवदत्त पडीक्कल हे द्रविडचे पाचही शिष्य यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहेत. सॅमसन व इशान भारताच्या अ संघाकडूनही खेळले आहेत. तर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल 19 वर्षांखालील संघाकडून खेळले आहेत. या दोन्ही संघांसाठी द्रविडनेच प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
यंदाच्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन भरीव कामगिरी करत आहे. दोन सामन्यात खेळताना त्याने दोनशेपेक्षाही जास्त स्ट्राईक रेट देत दीडशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघात निवड होण्यापूर्वी सॅमसन भारताच्या अ संघाकडून द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली खेळत होता.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचा नवोदित फलंदाज देवदत्त पडीक्कल याने एक आक्रमक सलामीवीर म्हणून आपली ओळख या स्पर्धेद्वारे निर्माण केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात 111 धावा केल्या आहेत. पडीक्कल हादेखील द्रविडचाच शिष्य आहे. तो 19 वर्षांखालील भारतीय संघात होता. त्याला जेव्हा बेंगळुरू संघाने आपल्याकडे घेतले तेव्हा खूप टीका झाली होती. मात्र, त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना टीकाकारांची तोंडे आपल्या कामगिरीने बंद केली.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असलेला उभरता स्टार फलंदाज शुभमन गिल देखील द्रविडच्या तालमीत तयार झाला आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण संघाचा भार वाहला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ हा देखील द्रविडचीच फाइंड आहे. त्याच्याकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खरा वासरदार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेल्या पृथ्वीने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे.
मागे एकदा स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्रशिक्षकांना माहिती न देता औषध घेतल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते. जागतिक व राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत ते औषध असल्याने पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली होती. त्याही वेळी तो अकादमीत जाऊन द्रविडला भेटला होता. आज मात्र, त्याला त्याच्या कारकिर्दीबाबत गांभिर्य असल्याचे सिद्ध होत असून आयपीएल स्पर्धेत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असलेला इशान किशान सध्या जास्त चर्चेत आहे. त्याने बेंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने 99 धावांची वादळी खेळी केली होती. त्याचे त्या सामन्यातील शतक जरी हुकले असले तरीही त्याच्या खेळीचे कौतुक जाणकारांनीही केले आहे.
जेव्हा द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तेव्हाच त्याच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक पद सोपवा अशी मागणी होत होती. त्यानंतर मात्र, त्याबाबत बीसीसीआयनेही गांभीर्य दाखवले व नव्या गुणवत्तेची धुरा त्याच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय सार्थ ठरवताना द्रविडनेही आपल्या पाचही शिष्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याच क्रिकेटच्या अभ्यासाचा जागतिक दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.