क्रिकेट कॉर्नर ; आयपीएलमुळेच ऑलिम्पिकचे दिवास्वप्न

अमित डोंगरे

जागतिक क्रिकेटमध्ये दोन दिवसांपासून सातत्याने एक बातमी चर्चिली जात आहे. ती म्हणजे 2028 साली होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. याबाबतच्या बातम्याची चांगल्याच गाजल्यादेखील. पण हे पुन्हा एकदा दिवास्वप्नच ठरणार यात शंका नाही. हा प्रयत्न शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वीही एकदा झाला होता. तसेच 1990च्या दशकातही झाला होता. अन्‌ हाती काहीही काय नाही.

कारण मुळातच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा व त्यातील क्रीडा प्रकार आणि क्रिकेटचे सामने यांच्यात मुख्य फरक आहे तो “वेळे’चा. ऑलिम्पिकमधील टेनिसच्या स्पर्धांचा अपवाद सोडला तर कोणत्याही स्पर्धांचे सामने एक तासापेक्षा जास्त चालत नाहीत. क्रिकेटचा समावेश करायचा झाला तर तो केवळ टी-20 प्रकारच्याच क्रिकेटचा केला जाऊ शकतो. पण ते सामने देखील पूर्ण होण्यास चार तास लागतात.
ऑलिम्पिकमधील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी वेळ हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे.

1900 साली हा प्रयत्न केला गेला. कारण त्या काळात मुळातच क्रिकेट कमी होत होते. जे खेळवले जात होते ते देखील कसोटी क्रिकेट. त्यानंतर 1970च्या दशकात एकदिवसीय क्रिकेट आले व 2000 सालात टी-20 क्रिकेटने बाळसे धरले. तरीही दोन्ही संघांचे प्रत्येकी एकेक डाव खेळायचे म्हटले तरीही चार तास लागणारच.

त्यात पुन्हा किती संघ खेळवणार. त्यांची पात्रता निकष काय लावणार. म्हणजे जे आयसीसी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी करते तेच येथेही होणार. तेच संघ ऑलिम्पिकच्या पदकासाठी खेळणार. अहो, स्वतःच्या देशाकडून खेळण्यापेक्षा त्यांना आयपीएल किंवा तत्सम टी-20 लीगमध्ये खेळणे जास्त लाभदायक वाटते ते खेळाडू ऑलिम्पिकमधील क्रिकेटसाठी उपलब्ध असतील का. ज्या आयसीसीला आयपीएलसाठी आपले वेळापत्रक बदलावे लागले. तीच आयसीसी ऑलिम्पिकसाठी वेळापत्रक बदलणार का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.

यामुळे ऑलिम्पिकमध्येही दिसणारा चौकार आणि षटकार असे मथळे दिसले तरीही त्याकडे लक्ष देऊ नका. कारण हे घडू शकत नाही व घडणारही नाही. आयपीएलचे यश पाहून या संघटनांचे डोळे विस्फारले गेले आहेत, बाकी काही नाही. कारण जिथे गूळ असतो तिथेच मुंगळे येतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.