– अमित डोंगरे
दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांच्या हातात काय जादू आहे हे समजत नाही. ते ज्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करतात तो संघ अजिंक्य ठरतो. 2011 साली भारतीय संघाचे ते प्रमुख प्रशिक्षक बनले व त्याच वर्षी झालेली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आपण जिंकलो. त्यानंतर ते गेल्या मोसमापासून गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक बनले आहेत. गुजरातच्या संघाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेचे पदार्पण करतानाच विजेतेपद पटकावले.
यंदाच्या मोसमातही गुजरातचाच संघ पहिल्यांदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे.जागतिक क्रिकेटमध्ये आपल्याला सगळं कळतं असे सांगणारे महाभाग अनेक दिसतात. काही क्रिकेटपटूंच्या नावाची दुकानदारी करत स्वतःचा बडेजावही अनेकजण दाखवतात. मात्र, पडद्यामागे राहून प्रत्यक्ष मैदानावर खेळाडूंकडून चमत्कार करवून घेणारे कर्स्टनसारखे अगदीच विरळा असतात.
गुजरातचा संघ तसा पाहायला गेले तर बलाढ्य म्हटला जाईल असे नाही. मात्र, गेल्या मोसमापासून ते जे सातत्य दाखवत आहेत, त्यामागे या सिद्धहस्त प्रशिक्षकाचाच हात आहे हे सहज लक्षात येते. कर्स्टन अशा देशाचे आहेत की ज्या देशाने एकदाही एकदिवसीय विस्वकरंडक जिंकलेला नाही. तसेच आयसीसीची एकही मोठी स्पर्धा त्यांना एकावेळा अपवाद वगळता जिंकलेली नाही. त्यांच्या दक्षिण आफ्रिका संघाला जागतिक क्रिकेटमध्ये चोकर्स असे संबोधले जाते.
मात्र, त्याच संघाचे प्रमुख फलंदाज असलेले कर्स्टन जेव्हा प्रशिक्षक म्हणून भारताला व आता गुजरातला लाभले तेव्हापासून चित्रच पालटले. त्यांच्याकडे रत्नपारखी म्हणून पाहिले जाऊ लागले. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्याला जेव्हा यश मिळते तेव्हा लोक बोलतात की, याला अमुक तमुकचा परिसस्पर्श लाभला. त्याच धर्तिवर असेच म्हणावेसे वाटते की गुजरात संघाला कर्स्टनस्पर्श लाभला. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.
आजवर याच दोन संघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. मात्र, गेल्या वर्षी पहिल्याच स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यापासून या स्पर्धेतही गुजरातकडेच संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाऊ लागले. यामागे यश केवळ कर्णधार हार्दिक पंड्या आणि कंपनीचेच नव्हे तर कर्स्टन यांचेही आहे हे विसरता कामा नये.