क्रिकेट कॉर्नर : संघाची प्रयोगशाळा करु नका…

-अमित डोंगरे

चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शाहबाज नदिमला खेळवत प्रयोग केला. खरेरतर याला जुगार म्हणावा का. पण असा जुगार महेंद्रसिंग धोनी यशस्वीपणे खेळायचा व त्यात यशस्वीही व्हायचा. कोहलीकडे ते नशिब नाही. केवळ अंतिम संघ घेषित करण्यापूर्वी काही क्षण अक्‍सर पटेल जायबंदी झाल्याचे समजल्यावर कोहलीने नदिमची वर्णी लावली. आता या मागे त्याचा स्वतःचाच हा निर्णय होता की कोणाचा नदिमवर वरदहस्त होताहे कळायला काहीही मार्ग नाही. आता पहिल्या सामन्यातील पराभवामुळे तोंड पोळलेला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत सहभागी होत असून त्यात संघाची प्रयोगशाळा होऊ नये हीच अपेक्षा आहे. 

एकतर संघाचे बलाबल पाहिले तर असे लक्षात येते की इंग्लंडचा संघ सध्या शारीरिक व मानसिक रीत्या भारतीय संघापेक्षा सरस आहे. त्यांच्यावर काहीही दडपणच नाही.त्यांनाच काय त्यांच्या चाहत्यांनाही माहिती आहे की भारताचा दौरा कठीण असतो. केवळ चार वर्षांपूर्वी त्यांनी मालिकाजिंकली असली तरीही या मालिकेत त्यांच्याकडूनसुरूवातीला अशा यशाची कोणीच अपेक्षा केली नव्हती. पहिला सामना जिंकत त्यांनी उलट बोनस दिला.

अर्थात, त्यांच्या कामगिरीला कुठेही कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही. पहिल्या कसोटीत त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण नाणेफेक जिंकली व फलंदाजी घेतली. त्यांचा कर्णधार ज्यो रूट रॉक ऑफ जिब्राल्टरसारखा उभा राहिला व थेट द्विशतकी खेळी खेळून गेला. त्याच्या या पराक्रमामुळे त्यांना पाचशेपेक्षा जास्त धावा फलकावर लावता आल्या व त्याच दबावासमोर भारताची भक्कम फलंदाजी कोसळली. या पडझडीत शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, ऋषभ पंत व रवीचंद्रन अश्‍विन हेच उभे राहिले व त्यांनी त्रिशतकी धावसंख्या गाठून भारताचा थोडीफार प्रतिष्ठा राखली. त्यांच्या दुसऱ्या डावात अश्‍विनने खेळपट्टीकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर त्यांचेसहा फलंदाज तंबूत धाडले मात्र, तरीही भारतीय संघाला याही डावात जबाबदारीने फलंदाजी करता आली नाही.

संघात तर असे एकापेक्षा एक सरस फलंदाज असूनही केवळ गिल व कर्णधार कोहली यांनीच या डावात चमक दाखवली. आता कोहली केवळ एखादवेळी चमक दाखवण्यापुरताच उरला आहे का अशी शंका येऊ लागली आहे. एकेकाळचे भारताचे हे रनमशीन गंज चढल्याने पूर्वीसारखे धावताना दिसत नाही. हिटमॅन रोहित शर्मा नवख्या फलंदाजासारखा बाहेरच्या चेंडूचा पाठलाग करण्याच्या नादात बाद होत आहे. हे दोन फलंदाज जागतिक किर्तीचे असूनही त्यांनी इंग्लंडच्या संमिश्र अनुभवी गोलंदाजीचा समर्थपणे सामना केलेला नाही.

आता जर हा सामना जिंकून भारतीय संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करायची असेल तर रोहित, कोहली, गिल, अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा यांच्यासह पंत व अश्‍विन यांनाही अत्यंत जबाबदारीने जिंकू किंवा मरू अशाच थाटात खेळावे लागणार आहे. संघाचा समतोल अक्‍सर पटेलच्या समावेशाने चांगला होईल मात्र, पुन्हा कोणता प्रयोग करण्याचे टाळले पाहिजे.
या सामन्यासाठी पहिल्या सामन्यासारखी बोगस खेळपट्टी नसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. भारतात ते देखील दक्षिणेत पहिल्या सामन्यात चक्क लाल मातीची खेळपट्टी पाहून धसकाच बसला होता. नवशिक्‍यांकडून खेळपट्टी केल्यावर दुसरे काय होणार म्हणा.

या सामन्यात खेळपट्टीवर जास्त पाणी मारलेले नसावे असे वाटते व लाईट रोलरही फिरवलेला असावा म्हणजे पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना व फलंदाजांना लाभ मिळेल. चेंडू बॅटवर व्यवस्थित येईल आणि धावाही होतील. नंतर मग तीन दिवस फिरकीचेच राज्य दिसेल येथील परंपरेनूसार अशी अपेक्षा करायला काय हरकत असावी. या सामन्याकडे संपूर्ण भारतीय संघाने गांभीर्यानेच पाहिले पाहिजे कारण ही क्‍लब दर्जाची लढत नसून आयसीसीच्या कसोटी विजेतेपद स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाची संधी आहे हे मुळात लक्षात घेतले पाहिजे. एका खेळाडूवरच अवलंबून राहण्यापेक्षा ऑस्ट्रेलियात केला तसा सांघिक खेळ केला पाहिजे तरच हा एक संघ वाटेल अन्यथा प्रयोगशाळा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.