क्रिकेट कॉर्नर : क्रिकेटपटू की पर्यटक

– अमित डोंगरे

सनरायझर्स हैदराबादच्या अपयशाची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षात त्यांना आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या संघात न्यूझीलंडचा सर्वात प्रमुख फलंदाज केन विल्यमसन याचा समावेश असतानाही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान कसे काय दिले जात नाही, हा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

खरे आहे, आजच्या घडीला भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा ज्यो रूट व न्यूझीलंडचा विल्यमसन या तिघांना जागतिक क्रिकेटचे सर्वेसर्वा मानले जाते. त्यात कोहलीकडे रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचे कर्णधारपद आहे. ज्यो रूट आयपीएल तसेच एकूणच टी-20 प्रकारचे क्रिकेट खेळत नाही.

राहिला विल्यमसन, तर त्याला खेळण्याची इच्छा असूनही आणि हैदराबाद संघात समावेश असूनही अद्याप यंदाच्या मोसमात खेळायलाच मिळालेले नाही. यावरून विल्यमसन एक क्रिकेटपटू आहे की पर्यटक असा प्रश्‍न पडतो.

यंदाच्या स्पर्धेकडे पाहिले तर हैदराबादने सलग दोन सामने गमावले आहेत. तसेच कर्णधार डेव्हिड वॉर्नर वगळता त्यांच्याकडे जागतिक दर्जाचा फलंदाजही नाही. शिवाय मनीष पांडे चांगला फलंदाज असला तरीही त्याच्या संथ फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे.

अशा स्थितीत असे काय कारण आहे की वॉर्नर विल्यमसनला संधी देताना दिसत नाही. सराव सत्रात हे दोघे खेळाडू एकमेकांशी वारंवार संवाद साधताना दिसतात. मात्र, अंतिम संघ निवड करताना अनपेक्षितपणे विल्यमसनला संघाबाहेर ठेवले जाते. याचे कारण काय, हे सो-कॉल्ड क्रिकेटचे समीक्षक सांगू शकतील का?

अत्यंत सुमार कामगिरीमुळे हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएल गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सकडून अवघ्या 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातूनही त्यांनी काहीही बोध घेतल्याचे दिसले नाही.

परिणामी त्यांना बंगळुरूकडूनही विजय हातात असतानाही केवळ सहा धावांनी पराभूत व्हावे लागले. यंदाच्या स्पर्धेत संघ सलग दोन सामने हरलेला असतानाही विल्यमसनला संघात स्थान देण्याचा कोणताही संकेत हैदराबाद संघ व्यवस्थापनाने दिलेला नाही, याचेही आश्‍चर्य वाटते.

त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहिल्यास असेच दिसून येते की त्याने सरस कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र, संघ मालक कलानिधी मारन, संचालिका काव्या मारन तसेच कर्णधार वॉर्नरला विल्यमसनला अंतिम संघात खेळवण्याची अद्याप इच्छा होत नसल्याचेच दिसत आहे.

आयपीएलमध्ये त्याने 53 सामन्यांत 1 हजार 619 धावा केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी त्याने ऑरेंज कॅप मिळवली होती. आयपीएलच्या 11व्या मोसमातही त्याने सातत्य सिद्ध करताना 735 धावा केल्या होत्या. जागतिक क्रिकेटमध्ये आज ज्यांच्याकडे दादा फलंदाज म्हणून पाहिले जाते त्यापैकी एक असलेल्या विल्यमसनला संघाबाहेर ठेवून हैदराबाद संघ व्यवस्थापन काय साधत आहे, हेदेखील एक कोडेच आहे.

येत्या सामन्यांमध्ये तरी हा सच्चा, प्रामाणिक, दिलदार व तितकाच अव्वल फलंदाज संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाहू या वॉर्नरला ते कधी लक्षात येते. पण एकच विचारावेसे वाटते की विल्यमसनला संघात घेतले ते त्याची क्रिकेटपटू म्हणून कामगिरी पाहूनच ना मग त्याला पर्यटक का करून ठेवले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.