क्रिकेट कॉर्नर : बायोबबलचा बागुलबुवा

– अमित डोंगरे

करोनाचा धोका कायम असल्याने जवळपास वर्षभर सगळेच खेळ बायोबबल सुरक्षेत खेळले जात आहेत. खरेतर या बायोबबलचा लाभ खेळाडूंना या धोक्‍यापासून दूर ठेवण्यासाठी होत असला तरीही काही दिवसांपासून अन्य खेळांतील खेळाडूंपेक्षा क्रिकेटपटूच याबाबत सातत्याने तक्रार करताना दिसत आहेत. याचा विनाकारण बागुलबुवा केला जात आहे.

खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफमधील व्यक्‍तींसाठी बायोबबल वातावरण (जैव सुरक्षा वातावरण) बनवण्यात येते. बायोबबल हा शब्द आपण सगळ्यांनी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये करोना साथीच्या दरम्यान झालेल्या मालिकेत ऐकला होता. त्याला “इको-बबल’ असेही संबोधतात. गेल्या वर्षी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेनंतर अमिरातीत झालेल्या स्पर्धेसाठीही अशीच सुरक्षा तयार केली गेली होती. ढोबळ मानाने सांगायचे झाल्यास असा सुरक्षा वातावरण की ज्यामध्ये बाह्य जगात राहणाऱ्या लोकांचा कोणताही संपर्क राहात नाही.

तसेच या सुरक्षेत राहात असलेल्या व्यक्ती बाहेरच्या जगापासून पूर्णपणे लांब राहतात. आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचारी, सामनाधिकारी, खेळाडूंचे कुटुंबीय व हॉटेल कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली जाते. त्यानंतर प्रत्येकाला बायोबबलमध्ये प्रवेश दिला जातो.
एकदा आपण त्यात गेल्यावर करोना चाचणी करणाऱ्या वैद्यकीय पथकाला देखील बाहेर जाऊ दिले जात नाही. यात केवळ अशाच व्यक्‍तींचा समावेश असतो की ज्यांची करोना चाचणी झाली आहे आणि ते निगेटिव्ह ठरले आहेत.

अमिरातीत झालेल्या स्पर्धेपूर्वी जवळपास वीस दिवस आधीच सर्व संघांची करोना चाचणी घेतली गेली होती. प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांची दोनदा करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. त्यानंतर जेव्हा तिसरी चाचणी निगेटिव्ह आली तेव्हाच प्रत्येकाला बायोबबलमध्ये पाठवले गेले.

बबलमध्ये समाविष्ट असलेल्यांनाच केवळ मैदान आणि हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी आहे. तसेच बायोबबलमध्ये असलेलेच त्यांना भेटू शकतात. स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांना, मित्रांना तसेच अन्य कोणाही व्यक्तीला भेटण्याची परवानगी नसते. स्पर्धा संपेपर्यंत बायोबबलमधील व्यक्तींना बाहेर जाऊ दिले जात नाही. अगदी आवश्‍यक कारणाने कोणाला बाहेर जायचे असेल तर परत आल्यावर त्यांना सात दिवस विलगीकरण सक्तीचे केले जाते.

बीसीसीआयने तयार केलेले बायोबबल नियमाचा भंग केल्यास त्याला आचारसंहिता भंग समजला जातो. त्यातील तरतुदीनुसार त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याअंतर्गत खेळाडूवर काही सामन्यांना बंदी घातली जाऊ शकते. तसेच खेळाडू व्यतिरिक्त कोण व्यक्ती असेल तर त्याला पुन्हा बायोबबलमध्ये प्रवेश दिला जात नाही. यंदा आयपीएल स्पर्धा भारतातच सहा केंद्रांवर होत आहे. त्यासाठी मुळात असलेल्या बायोबबल नियमांना आणखी कठोर केले गेले आहे. त्यामुळे या सुरक्षेतून बाहेर जाण्याची धमक कोणी दाखवेल याची सुतराम शक्‍यता नाही.

या सुरक्षेत खेळाडूच नव्हे तर ज्यांना परवानगी आहे ते सर्व सुरक्षित आहेत. आता जास्त काळ यात घालवल्यावर निराशा येते, कंटाळा येतो. पण जी गोष्ट करोनाच्या संकटात आपल्यासाठी लाभदायक आहे, त्यावरच सातत्याने टीका करत अनेक खेळाडू अन्य खेळाडूंची मानसिकताही निराशाजनक करतात व विनाकारण या बायोबबलचा बागुलबुवा करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.