क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले संकेत
मेलबर्न –ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने यंदा ऑक्टोबरमध्ये त्यांच्या देशात होणारी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा रद्द होणार असल्याचे संकेत दिले आहेत. करोनाचा धोका कायम असताना या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांना सुविधा पुरवणे शक्य होणार नाही, असे त्यांनी “आयसीसी’ला कळवले असल्याने आता या स्पर्धेबाबत रद्दचा निर्णय जाहीर करणे आयसीसीसाठी केवळ एक औपचारिकताच उरली आहे.
या स्पर्धेचे यंदा ऑस्ट्रेलियाला यजमानपद देण्यात आले होते. त्यासाठी सर्व सुविधाही सज्ज होत होत्या. मात्र, त्याचवेळी जगभरात करोनाचा धोका वाढल्याने जागतिक क्रीडाक्षेत्र ठप्प झाले. अनेक देशांप्रमाणे ऑस्ट्रेलिया सरकारनेही 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. आता ही स्पर्धा 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. परंतु आता ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही, असे मत त्यांच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीच्या बैठकीत मांडले होते. तेव्हापासूनच आयसीसी आपला निर्णय जाहीर करेल अशी शक्यता होती.
मात्र, दोन बैठका घेऊनही आयसीसीने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बीसीसीआयनेही आयसीसीला इशारा देत निर्णय जाहीर करण्यासाठी दबाब टाकायला सुरुवात केली. बीसीसीआयला 5 हजार कोटींचा तोटा होऊ नये यासाठी आयपीएल आयोजित करणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी आधी श्रीलंका मंडळावर दबाव टाकत आशिया करंडक स्पर्धा रद्द केली. त्यानंतर आयसीसीवरही दडपण टाकत टी-20 विश्वकरंडक रद्द करण्यासाठी दबाब टाकला आहे.
आयपीएलचा विचार करा….
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने खेळाडूंना टी-20 विश्वकरंडक नव्हे तर आता आयपीएल स्पर्धेचाच विचार करा, असे संकेत दिले आहेत. त्यांचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलचा यंदाचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह या स्पर्धेत सहभागी होत असलेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू करोनामुळे आर्थिक संकटातही सापडलेले असल्याने मंडळाने त्यांना आता केवळ आयपीएलचाच विचार करा, असे सांगितले आहे.