भाजप पदाधिकाऱ्यांना उद्घाटनाचा सोस : एकाच पुलाचे दोनदा उद्घाटन
दापोडी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना उद्घाटन कार्यक्रम घेण्याचा किती सोस आहे हे नुकतेच दिसून आले. सत्ताधाऱ्यांनी दापोडीतील हॅरिसच्या समांतर पुलाचे दोनदा उद्घाटन केले. पिंपरीतील पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पुल वाहतुकीसाठी खुला केला. सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे दिसून आले.
बोपोडी सिग्नल चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हॅरीस पुलाला समांतर पुल बांधण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेने पुलाचा खर्च केला. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तरित्या हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला होता. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये झाला आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा नवीन पूल 2 जुलै 2018 रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला होता.
पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येणारा समांतर पुल सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुणे महापालिकेने पुलासाठी पैसे दिले असतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यानंतर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पुलाचे उद्घाटन केले. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोपोडीतील भाजपचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. दोन्ही महापालिकेतील एकाच पक्षाच्या असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुलाचे दोनदा उदघाटन केले. सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सोमवारी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महापालिकेने पुन्हा उद्घाटन केल्याबाबत कल्पना नाही.
विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.