क्रेडिट, डेबिट कार्ड आणखी सुरक्षित

कार्ड स्वीच ऑन, ऑफ करता येणार ः स्वतःच्या व्यवहाराची मर्यादा ठरविता येणार

पुणे  – बॅंक ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार घडल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने डेबिट आणि क्रेडिट कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी 16 मार्चपासून होणार आहे.
16 मार्चपासून बॅंका जी नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करतील त्यामध्ये फक्‍त देशांतर्गत एटीएम आणि पॉइंट ऑफ सेल्स टर्मिनलवर व्यवहाराची मुभा असेल. मूळ क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून फक्‍त देशांतर्गत व्यवहार करता येतील. सुरुवातीला जारी केलेले किंवा फेरजारी केलेल्या कार्डवरून फक्‍त कार्ड वापरून म्हणजे कॉन्टॅक्‍ट करून व्यवहार करता येतील.

जर ग्राहकाला ऑनलाइन व्यवहार करायचे असतील, आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असतील, कॉन्टॅक्‍टलेस व्यवहार करायचे असतील तर ग्राहकाला बॅंकेकडे वेगळी परवानगी मागावी लागेल. मूळ जारी केलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमध्ये ही व्यवस्था नसेल. जर ग्राहकाला देशाबाहेर कार्ड वापरायचे असेल तर ग्राहकाने विनंती केल्यास त्यामध्ये बॅंकेला व्यवस्था करून द्यावी लागेल. सध्या जारी केलेल्या मूळ कार्डमध्येच (बाय डिफॉल्ट) देशाबाहेरही व्यवहार करण्याची व्यवस्था असते. जर एखाद्या कारणावरून गैरव्यवहार होण्याची शक्‍यता वाटली तर, ते कार्ड बंद करून पुन्हा जारी करण्याचे अधिकार बॅंकेला असतील. एखाद्या व्यक्‍तीने आपले कार्ड आतापर्यंत ऑनलाइन व्यवहारासाठी, आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी किंवा कॉन्टॅक्‍टलेस व्यवहारासाठी वापरले नसेल तर असे कार्ड बॅंक बंद करू शकते. कार्डधारकाला एखाद्या व्यवहाराच्या व्यासपीठावर म्हणजे एटीएम किंवा ऑनलाइन व्यवहारासाठी कार्ड स्वीच ऑन व स्वीच ऑफ करण्याची मुभा असेल.

तक्रारींचा अभ्यास केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेकडून उपाययोजना
ग्राहकाला आपल्या व्यवहाराची मर्यादा ठरविण्याची मुभा असेल. तसेच, हे नवे नियम प्रीपेड गिफ्ट कार्डसाठी लागू राहणार नाहीत. डेबिट-क्रेडिट कार्डचा गैरवापर करून गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बॅंकेकडे आल्या होत्या. या तक्रारींचा अभ्यास केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने या नव्या उपाययोजना केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.