घरांच्या माहितीसाठी क्रेडाईने जारी केले अ‍ॅप

नवी दिल्ली – क्रेडाई आणि नॅरडॅको या विकसकांच्या संस्थांना विकसकांच्या निवासी घराचे विपणन करता यावे याकरिता केंद्रीय गृहनिर्मिती आणि शहर व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत.

त्याचबरोबर स्थलांतरितांना भाड्याने घर घेता यावे याकरिता एक मार्गदर्शक पुस्तिका जारी करण्यात आली. यावेळी बोलताना पुरी यांनी सांगितले की, या दोन संस्थांबरोबर चर्चा करताना, अशा प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची गरज असल्याचे ध्यानात आल्यानंतर हे प्लॅटफॉर्म विकसित करून ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. क्रेडाईने क्रेडाई आवास ऍप सुरू केले आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असूनही सरकार या क्षेत्राला सापत्न वागणूक देत आहे, असा आरोप केला जातो. या विषयाकडे लक्ष वेधले असता पुरी म्हणाले की, या क्षेत्रासाठी गेल्या काही वर्षामध्ये केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. विकसकांनी घेतलेल्या कर्जाची एक वेळ फेररचना करण्याची गरज आहे, याकडे लक्ष वेधले असता पुरी म्हणाले की, घरनिर्मिती मंत्रालय विकासकांच्या या मागणीशी सहमत आहे. ही मागणी पूर्ण व्हावी याकरिता अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे, यावरही विचार करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.