करोनाविरुद्धच्या लढाईत ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चा सहभाग

महापालिकेच्या रुग्णालयात उभारणार अद्ययावत अतिदक्षता विभाग

पुणे – करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत सरकारी आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करणे नक्कीच हितावह ठरेल. नेमकी हीच बाब ओळखून बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज अशा अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात येणार आहे.

या संबंधीचा प्रस्ताव क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून तो नुकताच क्रेडाई पुणे मेट्रोचे प्रतिनिधी आय. पी. इनामदार व तेजराज पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांना सादर केला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि अभियंता विद्युत विभाग श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.

सदर अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी रुपये एक कोटी इतक्‍या निधीची आवश्‍यकता आहे. हा संपूर्ण निधी क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुक्तांनी हा प्रस्ताव स्वीकारला असून कामाला सुरुवात झाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई पुणे मेट्रोचे प्रतिनिधी तेजराज पाटील यांनी दिली. येत्या दोन आठवड्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल असेही पाटील यांनी नमूद केले. या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डीफिलेटर, सक्‍शन मशीन, इसीजी मशीन आशा 40 अद्ययावत उपकरणांचा समावेश असलेल्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.