नाशिकच्या चिमुकल्यांचा शुभेच्छापत्राद्वारे कोरोनायोद्ध्यांना सृजनशील सलाम

नाशिक : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुलांमधील कल्पकतेला अनलॉक करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एका कला शिक्षिकेने त्यांनासोबत घेत एक आभारपर्व सुरू केले, त्यामुळे घराघरातील मुलांच्या विविध कल्पनांना नवनिर्मितीची पालवी तर फुटलीच याशिवाय कोरोनायोद्धांनाही लढण्यासाठी बळ मिळाले. ही कल्पना होती आभारपत्रांची व शुभेच्छा पत्रांची ! विशेष म्हणजे चिमुकल्यांनी तयार केलेली ही डिजिटल शुभेच्छापत्र जेव्हा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पोहोचताहेत ते देखील भारावून जात आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रातिनिधीक स्वरुपात ही आभारपत्र स्वीकारून या नवकल्पनेचे स्वागत केले आहे.

कोरोनासारख्या आकलना पलिकडच्या शक्तीशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. जीवाची बाजी लावणाऱ्या योद्ध्यांना आज सारा समाज सॅल्यूट करीत आहे. कला शिक्षिका दर्शना राजपूत या लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मुलांच्या सृजनशीलतेला अनलॉक नाशिक, मुंबईसह देशातील कोरोना योद्ध्यांना हजारो शुभेच्छापत्र व ऑनलाइन ग्रिटिंग्ज पाठवून कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. या अनोख्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी, आरोग्य कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, घंटागाडी कर्मचारी, विद्युत कर्मचारी आणि दैनिके व माध्यमातील पत्रकारांचे मोबाइल नंबर, त्यांचे मेल आयडी मिळवून त्यांना ही आभारपत्र पाठविण्यात येत आहेत. नाशिकमधील फ्रावशी इंटरनॅशनल शाळेत कला शिक्षिका असलेल्या दर्शना राजपूत यांनी मार्च महिन्यापासून असे कार्ड पाठवण्याचे काम सुरू केले आहे.

पोलिसांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले या शुभेच्छापत्रांचे आपण प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकार केला आहे. या संकल्पनेमुळे आम्हा पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. या माध्यमातून चिमुकल्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी अतिशय सूक्ष्म विचार करून या युद्धाला अधिक बळ दिले आहे, अशा भावना पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केल्या.

डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिमुकल्यांमार्फत ई-कार्डस पाठविण्याचे काम आजही सुरू आहे. शुभेच्छापत्र ज्या विद्यार्थ्यांनी ते तयार केले आहे, त्याचे नाव, शाळा, वर्ग नमूद आहे. कोरोनायुद्धात सेवा देणारे कर्मचारी, व्यक्तीचे संपर्क क्रमांक शाळा आणि विविध कार्यालयाकडून मिळविले जातात व त्यांना सकाळी सकाळी वेळी हे ई-कार्ड पाठविले जातात. घरात राहून कंटाळलेल्या मुलांच्या मानसिकतेवर या उपक्रमामुळे निश्चितच एक चांगला प्रभाव पडला असून त्यांच्या सृजनशिलतेला पुरेपूर वाव मिळण्यास मदत झाली असल्याचे दर्शना राजपूत यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.