पायाभूत सुविधात मोठी रोजगार निर्मिती शक्‍य

बेरोजगारीचा दर वाढल्यास परिणाम

पुणे – भारतात सध्या फार मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. वस्तू निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीला मर्यादा येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर कारणामुळे या क्षेत्रातील रोजगार कमी होत आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करायचे असतील तर पायाभूत सुविधाच्या विस्तारीकरणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

भारतातील रोजगार शोधणाऱ्या तरुणांची माहिती घेऊन आयडीएफसी या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. त्या संस्थेने संकलित केलेल्या माहितीनुसार सध्या भारतामध्ये तब्बल 47 कोटी 30 लाख लोकांना रोजगाराची गरज आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारीकरणात शिवाय एवढ्या मोठ्या लोकांना रोजगार देता येणे शक्‍य नाही. सध्या बेरोजगारीचा दर 45 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी पायाभूत सुविधांकडे भर देण्याचे ठरविले असले तरी या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर सध्या रोजगार मिळेल त्याचबरोबर आगामी काळात या पायाभूत सुविधांच्या आधारावर मॅन्युफॅक्‍चरिंग आणि शेती क्षेत्रातून रोजगार निर्मिती वाढू शकेल. त्यामुळे भारतात मध्यम उत्पन्न गटाच्या देशात जाण्यास मदत होणार आहे.

मात्र, भारतातील पायाभूत सुविधांची गरज पाहता केंद्र आणि राज्य सरकार एवढे मोठे काम करू शकणार नाही त्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घ्यावी लागणार आहे. भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत.

शहरांचा विस्तार होणार
सध्या देशातील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे खासगी कंपन्यांनाही पुरेशा कार्यक्षमतेने काम करता येत नाही. 18 जिल्ह्यांमध्ये 2500 कंपन्यांनी छोटे मोठ्या कामाच्या माध्यमातून कशा प्रकारे रोजगार निर्माण केला याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहेत. हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर राबविल्यानंतर काय होऊ शकते याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. रस्त्याच्या माध्यमातून कनेक्‍टिव्हिटी वाढल्यानंतर उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. आगामी काळात शहरांचा विस्तार होणार आहे. या शहरांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यास वाव आहे. यासंबंधात कंपन्यांना विचारले असता त्यांनी अनेक भागात रस्ते, पाणी नाही, वीज नाही अशा प्रकारचे प्रश्‍न उपस्थित केले गेले. पायाभूत सुविधा विस्तारित केल्यानंतर हे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल आणि त्या ठिकाणी नवे उद्योग निर्माण होऊ शकतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.