रोजगार संधींसाठी “युथ फोरम’ तयार करणार

ना. अतुल भोसले : जुळेवाडीच्या जयवंत इंजिनिअरिग कॉलेजमध्ये युवावर्गाशी संवाद 

कराड – कराड दक्षिण मतदार संघातील युवा पिढी ही प्रतिभावान आहे. अखंड परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे. अशा तरुणाईला योग्य संधी मिळाली तर ते मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच आपल्या भागातील युवा पिढीला रोजगार संधी उपलब्ध व्हावी, यासाठी “युथ फोरम’ या नावाचे स्वतंत्र व्यासपीठ तयार करणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

जुळेवाडी (ता. कराड) येथील जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित युथ कनेक्‍ट कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतुलबाबांनी महाविद्यालयीन युवक- युवतींशी मनमोकळा संवाद साधत आपला जीवनप्रवास उलगडला. अतुलबाबांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण, समाजकारणातील प्रवेश, राजकीय वाटचाल, भाजप सरकारची ध्येयधोरणे, कराड दक्षिणमधील विकासकामे आणि भविष्यातील व्हिजन याबाबत युवक-युवतींनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

भोसले म्हणाले, “”माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कराडमध्ये झाले. लहानपणापासून मी माझे आजोबा जयवंतआप्पा आणि वडील डॉ. सुरेशबाबा यांचे सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम पाहत आलो. तेव्हापासूनच समाजासाठी काम करण्याची उर्मी माझ्या मनात निर्माण झाली. पुढे मी राजकारणात प्रवेश केला.

प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर स्वत: असे देशहिताचे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या भाजपत मी प्रवेश केला. ज्यांना मी माझ्या जीवनातील आदर्श मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवत मला पंढरपूरच्या श्री पांडुरंगाची सेवा करण्याची संधी दिली. या काळात विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न मी केला. भाजप सरकारच्या पाठबळामुळे कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींचा विकासनिधी प्राप्त झाला आहे.”

आपल्या भागातील तरूण-तरूणींना करिअरची दिशा निश्‍चित करण्याबाबत विशेष मार्गदर्शनाची आवश्‍यकता असून त्याबाबत धोरणात्मक पातळीवर कृती कार्यक्रम आखण्याचा मानस आहे. आज भाजप सरकार उद्योजक बनू पाहणाऱ्या युवकांना मुद्रा योजना व आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जरूपाने भरीव अर्थसाह्य करीत आहे. कौशल्य विकाससाठी लवकरच सरकार एक हेल्पलाईन सुरू करणार असल्याचेही ना. भोसले यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.