सह धर्मादाय आयुक्त देशमुख यांचे आदेश
पुणे – शहरासह जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार करोनाच्या रुग्णांसाठी आवशक बेड उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची उपलब्धता करावी, असे पत्र सर्व धर्मादाय रुग्णालयांना पुण्याचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने धर्मादाय कार्यालयाने ही ठोस पावले उचलली आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांत अपुऱ्या खाटांची क्षमता असल्याने तसेच आयसीयूची सुविधा नसल्याने पालिकेला खासगी रुग्णालयांच्या मदतीची गरज आहे. दरम्यान, दहा धर्मादाय व खासगी रुग्णालयांनी 30 ते 40 बेड व आयसीयू कक्ष देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिली आहे.
जर रुग्णांची संख्या वाढली तर त्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देता यावी, यासाठी रुग्णालयांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे. त्यानुसार रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– दिलीप देशमुख, सहधर्मादाय आयुक्त, पुणे विभाग