न्यूयॉर्क : जगात करोनाने चांगलाच तांडव सुरु केला आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र एक करत आहेत. त्यातच एक समाधानकारक बातमी समोर येत आहे. संशोधकांनी हवेतच करोनाचे विषाणू मारण्यास सक्षम असणारे एअर फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे. हे फिल्टर हवेतील करोनाचे विषाणू वेगळे करुन त्यांना नष्ट करते असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांच्या नव्या शोधामुळे बंद ठिकाणी म्हणजेच शाळा, रुग्णालये, कार्यालये शिवाय विमानांमध्ये करोनाचा फैलाव रोखण्यात मदत मिळू शकते. मटेरिअल्स टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये या अभ्यासाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जर्नलमध्ये या फिल्टरविषयी माहिती देण्यात आली आहे. या एअर फिल्टरमधून एकदा गेलेल्या हवेतून ९९.८ टक्के करोना विषाणू मारले गेले. हे उपकरण निकेल फोमपासून तयार करण्यात आले असून ते २०० डिग्री सेल्सियसपर्यंत तापते. त्यामुळे अँथ्रॅक्स आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ९९.९ टक्के जिवाणूंचा हे उपकरण नाश करते. हे फिल्टर विमानतळ तसेच विमानांमध्ये, ऑफिस, इमारती, शाळा आणि क्रूझ अशा ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यात उपयोगी असेल, असे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनचे अभ्यासातील सह-लेखक झिफेंग रेन यांनी म्हटले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याची या फिल्टरची क्षमता समाजासाठी फार उपयोगी होईल असेही ते म्हणाले आहेत.
करोनाचे विषाणू जवळपास तीन तास हवेत जिवंत राहत असल्याने एक असा फिल्टर तयार करण्याची योजना होती जो विषाणूंना लवकरात लवकर संपवेल आणि जगभरात पुन्हा एकदा कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने बंद ठिकाणी विषाणूंवर नियंत्रण मिळवेल असे संशोधकांनी सांगितले आहे. हे उपकरण सर्वात आधी शाळा, रुग्णालये, विमान, कार्यालयीन इमारती, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक ठिकाणी देण्यात येईल, अशी माहिती एअर फिल्टरच्या निर्मितीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनसोबत भागीदार असणारे मेडिकल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी मेडिस्टारचे गॅरेट पील यांनी दिली आहे. अभ्यासानुसार, करोनाचे विषाणू ७० डिग्री सेल्सिअस तापमानात टिकत नाहीत. त्यामुळे एअर फिल्टरचे तापमान २०० डिग्रीपर्यंत वाढवून करोनाचे विषाणू संपवले जाऊ शकतात.