डिझाइनसाठी महापालिकेतर्फे स्पर्धा : रोख बक्षीसही मिळणार
पुणे – महापालिकेच्या नियोजित भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी जे बोधचिन्ह लागणार आहे त्याच्या डिझाइनसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट बोधचिन्हासाठी महापालिकेने बक्षीसही ठेवले आहे. “स्मार्ट सिटी’च्या बोधचिन्हासाठीही महापालिकेने अशाचप्रकारची बोधचिन्हाची स्पर्धा घेतली होती. त्यातूनच सध्याचे असलेले बोधचिन्ह निवडण्यात आले होते.
हे महाविद्यालय हा महापालिकेसाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागी हे महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. याच्या बांधकमासाठी वर्ष-दीड वर्षे लागणार असले, तरी त्याची ऍडमिशन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचे वर्ग चालणार आहेत. यावर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी पुणे महापालिका आणि “मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट'(पीएमसी-एमईटी) स्थापन करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजासाठी स्वत:चे बोधचिन्ह आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि “पीएमसी-एमईटी’ ट्रस्ट या दोन्हीसाठी स्वतंत्र बोधचिन्ह तयार करावे लागणार आहे. त्यासाठीच लोकसहभागातून हे बोधचिन्ह मागवण्यात येणार आहे. हे बोधचिन्ह कायमस्वरूपी राहणार असल्याने हा त्या बनवणाऱ्या संस्थेसाठी किंवा आर्टिस्टसाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे.
उत्कृष्ट बोधचिन्हासाठी बक्षीस ठेवण्यात आले असून उत्कृष्ट बोधचिन्हाला पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि दोन हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळणार आहे. नागरिकांनी आणि संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
बोधचिन्हासाठी अटी
या बोधचिन्हामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र अनिवार्य असणार आहे. ट्रस्टच्या बोधचिन्हामध्ये पुणे महापालिका मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट’ अर्थात “पीएमसी-एमईटी’ या नावाचा समावेश असला पाहिजे. वरील मुद्द्यांचा समावेश असलेल्या लोगोलाच स्पर्धेत सहभाग मिळणार आहे.
बोधचिन्ह पाठवण्यासाठी संकेतस्थळ www.abvmc@punecorporation.org