‘त्या’ ठेकेदारांची ब्लॅक लिस्ट तयार करा

पुणे – जिल्ह्यात विकासकामे करताना काही ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती असूनही ठेकेदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे “जिल्हा परिषद नक्‍की ठेकेदार चालवतात का अधिकारी’ असा आरोप सदस्यांकडून वारंवार केला जातो. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. “अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालून काम करत असल्याचा’ आरोप सदस्यांकडून करण्यात आला. त्यामुळे यापुढे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची ब्लॅक लिस्ट तयार करून कारवाईचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

स्थायी समितीमध्ये सदस्यांनी ठेकेदारांचा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, प्रस्तावित कामांमध्ये कसूर करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सदस्यांकडून वारंवार करण्यात येत होती. त्या सदस्यांनी याबाबत सर्वसाधारण सभेतही प्रश्‍न उपस्थित केले होते. दौंड तालुक्‍यातील कामांमध्ये कसूर करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करून निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या संदर्भात सदस्य रणजित शिवतरे यांनी प्रश्‍न उपस्थित करून सदस्यांचे लक्ष वेधले. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आता यापुढे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्याची स्वतंत्र यादी तयार करावी, असे ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.