खड्डेमय दिवे घाट मृत्यूचा सापळा

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीमार्गाचे काम 10 वर्षांपासून रखडले

– एन. आर. जगताप

सासवड – येथून जवळील दिवेघाटात मंगळवारी (दि. 19) सकाळी पालखी सोहळ्यात जेसीबी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेमुळे दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 15 वारकरी जखमी झाले आहेत. एकंदरीतच या अपघातामुळे राष्ट्रीय पालखी महामार्गाची (एनएच965) दुरवस्था व रखडलेले काम पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून खड्डेमय दिवे घाट आणखी किती बळी घेणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग (एनएच 965) हा राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे वर्ग झालेला आहे. या महामार्गाकरता मोठ्या प्रमाणात निधीदेखील मंजूर झालेला आहे; मात्र या महामार्गाचे तब्बल 10 वर्षांपासून रुंदीकरणाचे काम रखडले आहे. माउलींच्या पालखी सोहळ्याअगोदर केवळ तात्पुरती डागडुजी करण्यावरच प्रशासनाचा जोर असतो. वारकऱ्यांनी ही वारंवार मागणी करूनदेखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नसून सध्या घाटात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे खड्डे चुकवताना वाहनांचा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुरंदर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या घाटातील डोंगरकड्यांचे ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच दरड कोसळू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसविणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार कल्पना देऊनही याकडे दुर्लक्षच केले जात आहे. घाटात अनेक ठिकाणी दिशादर्शक, सूचना फलक लावलेले नाही तर, घाटातील संरक्षक कठडे ढासळले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी झालेल्या वारकऱ्यांच्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना का जबाबदार धरले जाऊ नये ? असाही संतप्त सवाल विचारला जात आहे.

मंगळवारी घडलेली दुर्घटना ही अतिशय दुःखद असून यामुळे वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम गेली 10 वर्षे रखडलेले आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता पुरंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून या महामार्गाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.
– संजय जगताप, आमदार, पुरंदर-हवेली

Leave A Reply

Your email address will not be published.