देहूगावात खड्डेमय रस्त्यांनी वाहन चालक त्रस्त
झेंडे मळा ते देहुरोड रस्त्याची दुरवस्था
झेंडेमळा ते देहुरोड (पुणे-मुंबई महामार्ग) दरम्यानचा लष्कर भागातील रस्त्त्याची दयनीय दुरवस्था झाली असून, देहूरोड कॅंटोन्मेंट प्रशासनाने आणि लष्कराने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.
देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथील देहू-आळंदी आणि देहू-देहुरोड मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्ते खड्डेमय बनले आहेत. वाहन चालकांना खड्डे चुकवून वाहने चालवताना कसरत करावी लागत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. तर तासन्तास वाहन कोंडी होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तळवडे शिव ते झेंडेमळा दरम्यानचा सुमारे चार कि.मी. अंतराचे रस्त्याचे नव्याने डांबरीकरण काम करण्यात येत आहे. हा तयार करण्यात येणारा रस्ता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरू आहे. भूमिगत ड्रेनेज पाईप लाईनच्या कामामुळे विठ्ठलवाडी व माळवाडी येथील कामास विलंब झाल्याने अर्धवट ठेवण्यात आला आहे.
गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे रस्तामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तर दुतर्फा असलेल्या नागरिकांनी बंदिस्त गटारे केल्याने तसेच गटारांवर अतिक्रमण केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर थांबत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार होत आहे. रस्त्यावंर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दुरवस्था रस्त्याची झाली आहे.
या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना, महिलांना तर पादचाऱ्यांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तर वाहन चालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तासन्तास खोळंबत आहे. तर अपघातही वारंवार घडत आहे. संबंधित रस्त्यांच्या ठेकेदारांनी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवावीत, तर ग्रामपंचायतीने दुतर्फा तुंबणाऱ्या गटारी, नाले स्वच्छ करावीत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, शिवसेनेचे देहू शहराध्यक्ष सुनील हगवणे, रमेश हगवणे यांनी केली आहे.