जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
वाळूसोबत घरफोड्यांकडे लक्ष देण्याची गरज
मायणी पोलीस दुरक्षेत्रात तत्कालीन स.पो.नि रवींद्र गायकवाड, संतोष गोसावी यांनी सर्वच प्रकारचा क्राईम कमी केला होता. मात्र, या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने दाखल झालेले होतकरू पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर यांना अद्याप सुरू गवसला नाही. मायणी हे गाव संवेदनशील गाव म्हणून नोंद आहे. कोळेकर यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा काही कर्मचाऱ्यांनी उचलत आपण सांगू तेच योग्य असल्याचा बनाव केला आहे. या कर्मचाऱ्यांमुळे मायणी भागातील वाळू व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. कोळेकर साहेबांनी वेळीच सूत्रे स्वत:च्या हाती घेतली नाहीत तर, घरफोड्या, चोऱ्या व इतर गुन्हे कायम तपासावर राहतील.
सातारा – सातारा पोलीस दलाकडून बेस्ट पोलिसिंगचे नानाविध उपक्रम राबवण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात झालेल्या लुटीच्या घटना तसेच खटाव तालुक्यातील घरफोड्यांचे वाढलेले प्रमाण पाहता चोरटे पोलिसांच्या एक पाऊल पुढे असल्याचेच स्पष्ट होत आहे. वारंवार घडत असलेल्या चोऱ्या-घरफोड्या या घटना ताज्या असतानाच शनिवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील मांडवे येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमधील सर्वसामान्यासह सर्वजणच पुरते भयभीत झाले आहेत. वरिष्ठ पातळीवरून तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या जातात. मात्र, चोऱ्यांच्या गुन्ह्यात तपास लावताना ठाणे स्तरावरील पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.
काही दिवसांपूर्वी एलबीएस कॉलेज परिसरातून एका कुरिअर बॉयचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. याप्रकरणाचा अपवाद वगळता सातारा शहरातील एकाही चोरीच्या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. ही अवस्था सातारा शहराची तीच अवस्था वडूज पोलिसांची, वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जबरी चोरीचा तपास सोडला तर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मायणी दूरक्षेत्राच्या हद्दीत घडलेल्या एकाही चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर यांना लावण्यात यश आले नाही.
मायणी येथील चोरीच्या घटनेला अद्याप महिना उलटला असला तरी मायणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज पाहण्यापलिकडे गेलेले दिसत नाहीत. सातारा शहरातील बसस्थानक ते पारंगे चौक जाणाऱ्या रोडवर तर बॅग लिफ्टरंनी धुमाकूळ घातला आहे. एकाच आठवड्यात त्याच ठिकाणी, त्याच वेळी त्याच पद्धतीने बॅग लिप्टींगच्या दोन घटना घडल्याची शाहूपुरी पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहे. खरे तर पहिली घटना घडल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती, हा रस्ता रहदारीचा असल्याने पोलीस नेमणूक करायला हवे होते. बसस्थानक परिसरात पुण्या-मुबंईला जाणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते, त्यातच सुट्ट्यांचे दिवस असल्याने याच गर्दीत मोठी भर पडली. मात्र, याचा शाहूपुरी पोलिसांनी कोणताच ऍक्शन प्लॅन तयार केला नसल्यानेच चोरट्यांचे धाडस वाढले.
शाहूपुरी असो अथवा सातारा शहर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही पोलीस ठाण्यांना चोरट्यांचा तपास लागत नसल्याने, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा उलघडा करण्यासाठी सुचना केल्या होत्या. मात्र अद्याप तरी त्या सूचनांचे अवलोकन या दोन्ही पोलीस ठाण्यांना झाल्याचे दिसत नाही.
याचबरोबर खटाव तालुक्यातील मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या कारभाऱ्यांना तर अद्याप सूरच गवसला नसल्याची चर्चा सुरू आहे. मायणी दूरक्षेत्राच्या हद्दीत खुद्द मायणी शहरात, चितळीत, कलेढोण या गावांत चोरट्यांनी दुकाने, बंद घरे लक्ष्य केली होते. मायणीत तर चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या करून सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. मात्र, या घटनेला एक महिना झाला तरी मायणी पोलीस आरोपींना फक्त सीसीटीव्हीच पाहण्यात धन्यता मानत आहेत.
जिल्ह्यात घडलेल्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग तसेच बॅग लिफ्टींगच्या गुन्ह्यांचा तत्काळ उलघडा व्हावा म्हणून एका उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली बारा पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्यांच्या मागावर आहे. शहरात स्नॅचिंग करणारी एकच गॅंग असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील तसेच लोकांची जागृती व्हावी म्हणून पोस्टर, ध्वनीफितीच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. पोलीस कधीही “पुढे दंगा सूरू असल्याने दागिने काढून द्या’ असे म्हणत नाहीत. त्यामुळे लोकांनी सावध व्हावे, सोने पॉलीश करण्यासाठी कोणी आले तर तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला त्याची माहिती कळवा.
धीरज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा.